

रायगड : जयंत धुळप
पावसाळ्यात पक्ष्यांचे आगमन हे कोकणसाठी नवीन सुवार्ता ठरली असून चक्रवाक्, काळा बगळा, मास बुबी सह तिबोटी खंड्या, निळ्या छातीची पाणकोंबडी, नवरंग, चातक हे सात पक्षी पहिल्यांदाच पावसाळ्यात या भागात अधिवास करत असल्याचे आढळून आले आहेत. कोकणच्या पक्षी समृद्धतेच्या दृष्टीने हे महत्वाचे संकेत आहेत.
कोकणातील सुरक्षित आणि समृद्ध जैवविविधतेमुळे गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही परदेशी पक्षी स्थलांतर करुन महाराष्ट्रात विशेषतः कोकणच्या सागरी किनारपट्टीतील पाणथळ जागी येत असल्याची निरिक्षणे पक्षी अभ्यासकांनी नोंदवीली आहेत. पावसाळ्यात येणार्या या परदेशी पक्षांमध्ये यंदा आलेल्या तिबोटी खंड्या(ओरियंटल ड्वार्फ किंगफिशर), काळा-मुकुटधारी रात्र बगळा (ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन),निळ्या छातीची पाणकोंबडी (स्लॅटी ब्रेस्टेड रेल),नवरंग (इंडियन पिट्टा), चातक (पाईड क्रेस्टेड कुकू),चक्रवाक (रुडी शेलडक किंवा ब्राम्हणी डक) या सहा प्रमुख पक्षांचा समावेश असल्याचे सांगून त्यांची अभ्यासपूर्ण माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.वैभव देशमुख यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
मुळात पक्षी जे स्थलांतर करतात ते दोन प्रमुख गोष्टींसाठी ते म्हणजे अन्न आणि दुसरे म्हणजे प्रजनन. सद्यस्थितीत पश्चिम घाटातील वृद्धींगत झालेली जैवविविधता आणि त्या निमीत्त्ताने उपलब्ध खात्रीचे अन्न या प्रमुख कारणास्तव पक्षी आणि काही प्राणी देखील पावसाळ्यात स्थलांतर न करता येथेच राहाणे पसंत करित असल्याचे निष्कर्श पक्षी अभ्यासकांचे आहेत. पावसाळ्यात येणारे पाहुणे पक्षी म्हणजे स्थलांतरित पक्षी, जे अन्नाच्या शोधात किंवा प्रजननासाठी योग्य आणि सुरक्षित वातावरणामुळे पावसाळ्यात देखील आता कोकण किनारपट्टीत येवू लागले असल्याचे दिसून येत असून, त्यांचे पावसाळ्यातही येथे येणे हे येथील जैवविविधता समृद्धीवर शिक्कामोर्तब करणारे म्हणावे लागेल असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.वैभव देशमुख यांनी पूढे सांगीतले.
पावसाळ्यात, राज्यातील विशेषतः कोकणातील खाडी प्रदेश, पाणथळीच्या जागा, कांदळवन क्षेत्रे येथे अन्नाची उपलब्धता वाढते, ज्यामुळे स्थलांतरित पक्षी येथे येत असल्याचे दिसून आले आहे. काही पक्ष्यांसाठी पावसाळ्यातील वातावरण प्रजननासाठी योग्य असते. त्यामुळे ते या काळात येथे येवू लागले असल्याचे दिसून येते. काहीवेळा पक्षी नवीन ठिकाणी स्थलांतर करतात त्याचे कारण त्यांना नवीन अधिवास किंवा अन्नस्रोत शोधायचे असतात, त्यातूनच हे पक्षी पावसाळ्यात येथे येत असल्याचा निष्कर्श सल्याचे डॉ.देशमुख अखेरीस म्हणाले.
रायगड जिल्हा पक्षी म्हणून वन खात्याकडून मान्यता मिळालेला ओरियंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी पावसाच्या प्रांरभी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीत येतो. भूतान आणि श्रीलंका या देशांतून तो दोन ते तीन महिन्यांसाठी विणीकरिता (ब्रिडींग) स्थलांतरित होवून येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात. नर मादी एकमेकांना शिळ घालून साद देतात. जोडी जमल्यावर एखाद्या ओहळात किंवा ओहळाशेजारी मातीच्या कड्यात नर मादी बीळ करून घरटे करतात. पाल, छोटेसाप, छोटे खेकडे, कोळी, बेडूक हे खंड्याचे आवडते खाद्य या काळात येथे विपूल प्रमाणात उपलब्ध असते. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असते अशा क्षेत्रात एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्याबाहेर येतात तो पर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. मे ते ऑक्टोबर या काळात रायगड जिल्ह्यामध्ये दिसणार्या या खंड्याचे रंग अतिशय आकर्षक असतात. निळा, पांढरा, केशरी आणि काळा या रंगसंगीतमुळे पक्षी छायाचित्रकार त्यांच्या प्रेमातच पडतात.
ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन म्हणजेच काळा-मुकुट असलेला रात्रीचा बगळा हा एक मध्यम आकाराचा बगळा आहे. याला मराठीमध्ये रातढोकरी, रात्रिंचरबगळा, रातबगळा, राजकोक्कू किंवा अंधारी ढोकरी अशाही नावांनी ओळखले जाते. युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असणारा हा रात्रबगळा पावसाळ्यात कोकण किनारपट्टीत येतो. समुद्र खाड्या,खारफूटी जंगले आणि पाणथळींच्या जागी मासे, बेडूक,विविध किटक येथे मोठ्या प्रमाणात आणि सहजगत्या खाद्य म्हणून मिळत असल्याने प्रजननाकरिता हा रात्र बगळा पावसाळ्याच्या काळात कोकणात येतो. या बगळ्याचे डोके आणि पाठ काळी असते, तर बाकीचे शरीर पांढर्या रंगाचे असते. डोळे लालचूटूक आणि चोच मजबूत व काळी असते. हा निशाचर पक्षी असून रात्रीच्या वेळेस जास्त सक्रिय असतो.
स्लॅटी ब्रेस्टेड रेल अर्थात निळ्या छातीची पाणकोंबडी या पक्ष्याला हिंदी मध्ये कबरी मुर्गी असेही म्हटले जाते. श्रीलंका, पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेशात मोठ्या प्रमाणात संचार असलेल्या या पाणकोंबड्या पावसाळा सूरु झाल्यावर भारतात आणि विशेषतः किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात येतात. लांबट चोच,मानेच्या मागचा भाग काळसर लाल, पंखांवर पांढरे पट्टे, ठिपके आणि निळ्या रंगाची छाती असे देखणे रुप या पाणकोंबडीचे असते. अत्यंत चंचल हालचालीमुळे ती पटकन दिसून येते. त्यांचा वीणीचा हंगाम जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर या सुमारे पाच महिन्यांच्या काळात असतो.
पाऊस आला अशी वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला ‘इंडियन पिट्टा’ म्हणजे नवरंग पावसाळ्या पूर्वी म्हणजे मे अखेर वा जुनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात दाखल होतो. पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची घरटी आढळतात. श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पावसाळ्याच्या पूर्वी पश्चिम घाटाच्या किनारी भागात येतात. तेलगू भाषेत ‘पिट्टा’ म्हणजे’लहान पक्षी’ असा अर्थ आहे. मराठी स्थानिक भाषेत त्याला नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव अशा नावांनी ओळखले जाते. निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा या रंगसंगतीमुळे हा पक्षी छायाचित्रकांरासाठी एक पर्वणीच असतो. त्यांचा विणीचा कालावधी हा मे ते ऑगस्ट असा चार महिन्यांचा असून गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी घालते.
पाईड क्रेस्टेड कुकू अर्थात चातक हा पक्षी देशांतर्गत स्थलांतर करणारे पक्षी आहे. सुमार तीस सेमी आकारमानाचा हा पक्षी पावसाळ्यात कोकणात स्थलांतरित होतो. त्याला झाडांवर राहणे पसंत असले तरी कीटकांच्या शोधार्थ चातक जमिनीवरही येतात. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असा तीन महिन्यांचा असून याचे स्वतःचे घरटे नसते. चातकाची मादी आपले अंडे दुसर्या एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात घालून निघून जाते. चातकाच्या पिलांची देखभाल ते घरटे ज्या पक्षाचे असते त्या पक्षाची मादी करते हे एक वेगळेपण आहे. चातक पक्षी फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी आहे अशी कविकल्पना आहे. प्रत्यक्षात इतर पक्ष्यांप्रमाणेच चातकही जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो. काळ्यापांढर्या चातक पक्ष्याच्या डोक्यावर काळा तुरा असतो. हा भर पावसात म्हणजेच साधारण जून-सप्टेबरमध्ये दिसणारा पक्षी आहे. चातक कोकिळेच्या परिवारात गणला जातो.
रुडी शेलडक अर्थात चक्रवाक हा बदक प्रकारातील स्थलांतरीत पक्षी आहे. त्यास ब्राम्हणी बदक या नावाने देखील ओळखले जाते. हिमालयातील सर्वाधिक उंच रांग ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून अशी देखील या पक्ष्याची ख्याती आहे. अतिदक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. पावसाळ्याच्या आसपास ते किनारी भागात दिसून येतात. हे पक्षी तलावात जोडीने वा छोट्या गटाने राहातात. चक्रवाक उत्तम पोहणारा असला, तरी तो पाण्याच्या काठावरच राहणे पसंत करतो. आपला समुह एकत्र राखण्यासाठी आणि संकटाची कल्पना इतरांना देण्यासाठी त्यांचे ओरडणे चालू असते. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात. झाडांचे हिरवे कोंब आणि बिया छोटे प्राणी, पाणकीटक, बेडूक, मासे इत्यादी त्यांचे खाद्य आहे. त्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल-जुलै असा सुमारे तीन महिन्यांचा असतो.
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील खाडी किनारी उन्हाळ्यात सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांपैकी काही पक्षी हे गेल्या एकदोन वर्षांपासून पावसाळ्यात देखील काही प्रमाणात येथे मुक्कामी असल्याची निरिक्षणे पक्षी अभ्यासकांनी नोंदवली आहेत.
मास्क बुबी हा मुळ पॅसिफिक अटलांटिक किनार्यावरील वास्तव्यास असणार पक्षी आहे. काही पक्षी स्थलांतर करताना तिव्र वार्याच्या वेगाबरोबर उडतात त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्या ऐवजी प्रसंगी भारतात पोहोचतात. अशाच प्रकारे एक मास्कबुबी हा पक्षी अलिकडेचे ठाणे जिल्ह्यात अबंरनाथ येथे आढळून आला होता. तो पूर्णपणे दमलेल्या अवस्थेत होता. पक्षी मित्र आणि वन विभागाच्या अधिकार्यांनी त्यांवर उपचार करुन त्यांस अधिवासात सोडले आहे.