

खानिवडे : वसई तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण चव व सुगंधासाठी ओळखला जाणारा गावठी पावटा आणि लाल वाल यंदा निकृष्ट दर्जाचा निघाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फुलोरा भरपूर येऊनही शेंगांतील दाणे नासके व शुष्क लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी अखेर वालाचे पीक उखडून शेती मोकळी करण्याचा निर्णय घेतला आहे.बदलत्या हवामानाचा फटका या पिकांना बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रब्बी हंगामातील महत्त्वाचे नकदी पीक म्हणून ओळखला जाणारा वाल दरवर्षी शेतकऱ्यांना चांगला फायदा करून देतो. खरिपातील भात काढणीनंतर चणा, तूर, मूग, उडीद, तीळ यांसह पावट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र यंदा जवळपास सहा महिने सुरू राहिलेल्या पावसामुळे रब्बी पेरण्या उशिरा झाल्या. परिणामी पीक कालावधी लांबला आणि अपेक्षित उत्पादन वेळेत मिळाले नाही.
हिवाळ्यात चांगले वाढणारे हे पीक यंदा फेब्रुवारी-मार्चमधील वाढत्या उष्णतेला सामोरे गेले. त्यातच जमिनीत राहिलेला अतिरिक्त ओलावा यामुळे शेंगांतील दाणे आतून नासके होऊ लागले किंवा पूर्णपणे कोरडे पडले. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शेतांमध्ये वालाची हिरवीगार वाढ दिसत असली तरी प्रत्यक्षात त्यातून उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पुढील खरीप हंगामासाठी वेळेत तयारी करण्यासाठी हे तोट्याचे पीक उखडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे, दवावर वाढणाऱ्या वसईच्या या गावठी वालाला एक वेगळीच चव व सुगंध लाभतो. उकडलेल्या शेंगा असोत किंवा मडक्यात शिजवलेली पारंपरिक ‘पोपटी’, या वालाची चव खवय्यांना भुरळ घालणारी असते. मात्र यंदाच्या निकृष्ट उत्पादनामुळे ही खास चवही रसिकांना कमीच अनुभवायला मिळणार आहे.
शेती केली मोकळी
शेतात आजही वालाचे पीक हिरव्या बहाराने डोलत आहे.फुलोरा सिझन संपल्यावर धरला असल्याने व पिकाला जे हवे ते हवामान सरल्याने वालाचे दाणे आतून नासके किंवा उन्हाच्या तिव्रतेमुळे शुष्क निर्माण होऊ लागले आहेत.तर येत्या पंधरा दिवसांनी खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे.त्यामुळे उत्पादन मिळत नसल्याने वालाचे पीक उखडून शेती मोकळी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.