

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : १४ गावातील प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने हाती घेतला आहे. कारखाने वाचवण्यासाठी कारखानदारांनी थेट केमिकल उत्तर शिवच्या नदीपात्रात सोडून दिले आहे. या शुद्ध पाण्याची असलेली उत्तरशिव नदी आता केमिकलची नदी तयार झाली आहे. त्यामुळे या केमिकलमाफियांना १४ गावातून हद्दपार करणे हाच पर्याय सध्या प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. आधी सफेद फेसळलेली नदी आठ दिवसांनी काळ्या रंगाने प्रदूषित झाली आहे. प्रदूषित पाण्यासोबत दुर्गंधी पसरल्याने नदीची अवस्था बिकट झाली आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये असलेल्या पिंपरी, उत्तर शिव, दहिसर मोठ्या प्रमाणात रासायनिक गोडाऊन तयार झाले आहेत. या गोडाऊन मधून रात्रीच्या वेळी केमिकल माफिया नदीपात्रात रसायन सोडून देण्याचे काम करत आहेत. तर पिंपरी गावाजवळ या केमिकल माफियांनी प्लास्टिक व इतर केमिकल रात्रीच्या वेळी पेटवून देण्याचे गोरख धंदे सुरू केले आहेत. या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी वेळो- वेळी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता. मात्र यासंदर्भात स्थानिक आमदार राजू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व कारखान्यांची कसून तपासणी करत कारखाना मालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आपल्या कारखान्यांवरील कारवाया टाळण्यासाठी कारखान्यांमध्ये असलेले रासायनाचे साठे नदीपात्रात सोडून स्वच्छ नदीचे रूपांतर हे केमिकलच्या नदीत केल्याचं वास्तव समोर आला आहे. त्यामुळे भंगार माफियांनी प्रदूषण करण्यासाठी सोयीचे असलेल्या १४ गावातील प्रदूषणाचे कारखाने बंद करणे हाच एक महत्वाचा उपाय राहिल्याने १४ गावांमधील प्रदूषणाचे ढंग से केव्हा कमी होणार हा प्रश्न आहे.
१४ गावांमध्ये असलेले रासायनिक कारखाने शोधण्यासाठी सध्या ग्रामसेवक आणि प्रशासक हे प्रत्यक्ष जात आहेत. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांना प्रत्यक्ष नोटिसा देऊन त्याची यादी ही प्रदूषण नियंत्रण महामंडळ नवी मुंबई यांच्याकडे सुपूर्द केली जात आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि टोरंट कंपनी कारवाई करून वीजपुरवठा खंडित करत आहेत. ग्रामपंचायत पाणी आणि टोरंट वीज पुरवठा खंडित करत असल्याने सध्या केमिकल माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.