

उरण : उरण तालुक्यातील रानसई आणि बारापाडा जंगल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल टिपली गेल्याने वन विभागाने या परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रानसई आणि बारापाडा जंगल क्षेत्रात बिबट्या फिरत असल्याचे चित्र चलचित्रीकरण (व्हिडिओ) कॅमेऱ्यात कैद झाले आहे . मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने, विशेषतः जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
बिबट्याचा वावर आढळताच वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी माहिती देणारे बॅनर लावून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. वन्यप्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले असल्याने रहिवाशांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधा मधुकर पारधी यांनी या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, रानसई ही आदिवासी लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत असून, येथील नागरिकांचे संपूर्ण जीवन जंगलावर अवलंबून आहे. बिबट्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, वन विभागाने तात्काळ पुढाकार घेऊन या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जंगलातील वाढते अतिक्रमण आणि सतत लागणारे वणवे यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या परिसरात भीतीचे सावट असून, वन विभाग बिबट्याला पकडण्यात कधी यशस्वी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिबट्याचा वावर आढळताच वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी माहिती देणारे बॅनर लावून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. वन्यप्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले असल्याने रहिवाशांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.