

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात माजी नगरसेवकांची तिकिटे कापून निष्ठावंत शाखाप्रमुख , महिला शाखाप्रमुख यांना तिकीट दिले असल्याने नाराज माजी नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिंदे गटाची लंगडी वाटणारी बाजू सावरण्यासाठी शिंदे हे नाराजांच्या भेटी घेत आहेत.
शिंदे यांनी शिवसेना सोडल्यापासून मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या 40 हून अधिक माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेतले आहे. पण ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे मुंबईतील मराठी मतदारांचे विभाजन फारसे होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे भाजपसोबत असल्याने मराठी मतदारांमध्ये त्यांच्याबाबत अनुकूल वातावरण नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तिकिट वाटपावरून मनसे आणि ठाकरे गटाच्या नाराज असलेल्या पदाधिकाऱ्याना शिंदे यांनी आपल्यागटात खेचण्याची रणनीती आखली आहे.
मनसेचे वरळी येथील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे यांनी, दादरचे माजी आमदार सदा सरवणकर यांना फोन करुन संतोष धुरी यांना पक्षात घेण्यास सांगितले होते. परंतु स्थानिक राजकरणातल्या अडचणीमुळे सरवणकर यांनी धुरी यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
ठाकरे यांच्या पक्षाच्या नाराजांच्या जखमांवर एकनाथ शिंदे हे त्यांची भेट घेऊन फुंकर घालत आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवली येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची पकड आहे. पण मुंबईत शिंदे यांची अडचण आहे. त्यांना मुंबईतील त्यांच्या नेत्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. शिंदे गटाचे नेते हे त्यांना अडचणीचे वाटणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी शिंदे यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे शिंदे हे मैदानात उतरले आहेत. रात्री उशिरापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
मुंबईतील अनेक प्रभागात शिंदे गटाच्या विरोधात भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळेही शिंदे यांची अडचण झाली आहे. ठाण्याबरोबर शिंदे यांनी मुंबईत लक्ष दिले असून त्यांचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रातील प्रभाग जिंकण्यावर त्यांचा भर आहे.