

महाड : महाड नगरपरिषद प्रशासनाच्या मान्सून पूर्व क नियोजनतेचा परिणाम महाड कर नागरिकांना सहन करावा लागत असून शहराच्या दक्षिण दिशेकडील रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी नाका मार्गावर आलेल्या पावसात रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र अनुभवास आले.
महाड शहरातील दस्तुरी नाका ते नातेखिंड हा किल्ले रायगड परिसरासह आजूबाजूच्या गावांना जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग अवघ्या तासभर झालेल्या मुसळधार पावसात जलमय होत असल्याचे चित्र यंदा पाहावयास मिळत असून मंगळवारी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. विशेष म्हणजे सावित्री नदीला पूरस्थिती निर्माण झालेली नसतानाही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सध्या या मार्गावरील पाटीलवाडा हॉटेल परिसरात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने सध्या या मार्गावरील पाटीलवाडा हॉटेल परिसरात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यंदाच्या पावसाळ्यात तासभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर या परिसरात अशीच परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. रस्त्यालगत करण्यात आलेले भराव, अरुंद झालेले नाले आणि अपुरा पाण्याचा निचरा यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे ही परिस्थिती पूर-स्थितीमुळे नव्हे, तर केवळ पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात अतिवृष्टी किंवा सावित्री नदीची पाणीपातळी वाढल्यास हा मार्ग पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रस्त्यालगतचे नाले, चर आणि पाण्याचा निचरा होणारे मार्ग तातडीने स्वच्छ करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
नैसर्गिक नाले, चर अरुंद
या मार्गावरील पाण्याच्या निचऱ्याची समस्या, रस्त्यालगत झालेल्या भरावांमुळे नैसर्गिक नाले आणि चर अरुंद झाल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून यापूर्वीच सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने त्याचे परिणाम पहिल्याच जोरदार पावसात दिसून आले.