ONGC Chemical Leak: उरणमध्ये ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी; नागरिकांना श्वसनाचा त्रास, परिसरात घबराट!

परिसरातील नागरिकांना तीव्र श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून, काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
ONGC Chemical Leak
ONGC Chemical LeakPudhari
Published on
Updated on

उरण: उरण तालुक्यातील केंद्रशासनाच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या नाल्यामधून अचानक मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी वाहून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या रसायनमिश्रित पाण्यातून पांढरा धूर निघत असून, संपूर्ण परिसरात उग्र रासायनिक दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र श्वसनाचा त्रास जाणवू लागला असून, काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएनजीसी प्रकल्पाच्या नाल्यातून अचानक हे दूषित पाणी वाहू लागले. या रसायनाच्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली, तर काहींना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि अस्वस्थता जाणवू लागली. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.

ONGC Chemical Leak
Car Accident: कनेक्टिंग लिंकवरील व्हॅली ब्रिजवर तीन कारचा अपघात

घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेरून थेट जाब विचारला, ज्यामुळे नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.

परिसरातील पर्यावरण, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि वाढता तणाव पाहता, तातडीने ग्रामस्थ आणि ओएनजीसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

ONGC Chemical Leak
Who is Sushant Doshi: पहिला पगार 2 हजार रुपये, आज एका बड्या कंपनीचा मालक

या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. सदर रसायन नेमके कोणते होते, त्याचे मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि ही गळती नेमकी कशामुळे झाली, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने आणि ओएनजीसीने तातडीने द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यापूर्वीही तेल गळतीच्या दुर्घटना

यापूर्वीही याच परिसरात भीषण तेलगळतीची घटना घडली होती, ज्यामध्ये लागलेल्या आगीत एका स्थानिक नागरिकाला आपला जीव गमवावा लागला होता. आजच्या या घटनेमुळे नागरिकांच्या मनातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, ओएनजीसीच्या वारंवार होणाऱ्या या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

"ओएनजीसी मार्फत वारंवार अशा घटना घडत असून हा प्रकल्प नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. हा धोकादायक खेळ आता कुठेतरी थांबला पाहिजे. संबंधित नाला थेट समुद्राला जोडलेला असल्याने हे दूषित रसायन समुद्रात गेल्यास समुद्री जीव धोक्यात येतील. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. ओएनजीसीने यावर तात्काळ कायमस्वरूपी उपाय करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- चेतन म्हात्रे, सरपंच, नागाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news