Uran fertilizer shortage : कृषी सेवा केंद्रचालकांचा खतांची नवीन मागणी नोंदवण्यास नकार

उरणमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशाला केंद्रांची केराची टोपली; शेतकरी हतबल
Uran fertilizer shortage
Uran fertilizer shortagepudhari photo
Published on
Updated on

उरण : चालू खरीप हंगामात भात पिकाला रासायनिक खतांची नितांत गरज असताना, उरण तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी चक्क तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवीन ‘एफएफएस’ ऑनलाइन खत विक्री प्रणालीतील अडचणी आणि खते संपण्याची कोणतीही हमी नसल्याचे कारण सांगत केंद्र चालकांनी नवीन खतांची मागणी नोंदवण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी खते उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून, हातातोंडाशी आलेली भाताची पिके हातून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

चालू वर्षी 'एल निनो'च्या प्रभावामुळे उरण तालुक्यात भाताची लागवड काहीशी उशिराने झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उरण यांच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील मुख्य कृषी सेवा केंद्रांना लेखी आदेश जारी करण्यात आले होते.

Uran fertilizer shortage
Raigad Ganeshotsav Traffic : महामार्गावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘वॉच’

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भास्कर बामा भोईर कृषी सेवा केंद्र (मोठी जुई), जगजीवन पाटील कृषी सेवा केंद्र (कोप्रोली), लक्ष्मिप्रसाद कृषी सेवा केंद्र (आवरे), नामदेव नाना पाटील कृषी सेवा केंद्र (पाणदिवे), अक्षय कृषी केंद्र (उरण/पाणदिवे) आणि गणेश ठाकूर कृषी सेवा केंद्र (विंधणे) या सहा प्रमुख आस्थापनांना स्थानिक गरजेनुसार खतांची मागणी नोंदवून प्रशासनाला कळवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

शासकीय आदेश मिळूनही कृषी सेवा केंद्र चालकांनी खतांची मागणी नोंदवण्यास ठाम नकार दिला आहे. नवीन एफएफएस ऑनलाइन खत विक्री प्रणालीमुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि खरेदी केलेले खत वेळेत विक्री झाले नाही तर ते शिल्लक राहण्याची (खपण्याची हमी नसण्याची) भीती, अशी कारणे पुढे करत केंद्र चालकांनी खते मागवणे बंद केले आहे.

भाताचे पीक सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून या काळात खतांचा डोस न मिळाल्यास पिकांचे अपरिमित नुकसान होणार आहे. कृषी सेवा केंद्र चालकांच्या या अट्टहासी व मनमानी भूमिकेमुळे शेतकरी दुकानांचे फेरे मारून हताश झाले आहेत.

Uran fertilizer shortage
Raigad Political News : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक आणि सुटका
  • यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड आणि कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्याकडेही अहवाल सादर केला आहे. आता वरिष्ठ प्रशासन या बेजबाबदार कृषी सेवा केंद्र चालकांवर काय कडक कारवाई करते आणि शेतकऱ्यांना तातडीने खते उपलब्ध करून देण्यासाठी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण उरण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news