अलिबाग : मे महिन्यातील अवकाळी पाऊस यामुळे आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या नजर पाहणीत जिल्हृयात 937.15 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून पंचनाम्यांचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. उन्हाळी भातपीकाला सर्वाधिक फटका बसला असून पीक हातचे गेल्याने शेतकर्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.
यावर्षी पहिल्यांदाच अवकाळी पावसाने मे महिन्यात जोरदार बरसात केली. अवकाळीचा जोर ओसरण्यापूर्वीच मान्सून दाखल झाला. आणि मान्सूनच्या पावसाने आपल्या आगमनाची वर्दी देताना रायगडकरांना बेजार करून सोडले. वादळी वार्यांसह जोरदार बरसणार्या पावसाने रायगडला अक्षरशः झोडपून काढले.
या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसला. मे महिन्याच्या अखेरीस जिल्हयात उन्हाळी भातशेतीची कापणी सुरू होती. काही ठिकाणी कापणीची कामे सुरू होती. तर काही भागात कापणी व्हायची होती परंतु त्यापूर्वीच आलेल्या पावसाने सगळं वाहून नेलं. उभे पीक शेतात आडवे झाले. आता या दाण्यांना मोड आले आहेत.
रायगडमध्ये कर्जत, पेण, रोहा आणि माणगाव बरोबरच खालापूर आणि पाली तालुक्यात काही प्रमाणात उन्हाळी भातपीक घेतले जाते. या तालुक्यातील कापलेल्या उन्हाळी भातपीकांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. तर याच तालुक्यात काही प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले. पोलादपूर , उरण, पनवेल कर्जत या चार तालुक्यातील आंबा पीक अवकाळीने धोक्यात आले. यात प्रामुख्याने फळगळती, देठकुजवा आणि फळामध्ये साका पडल्याने फळे फेकून देण्याची वेळ बागायदारांवर आली. मात्र यंदा आंब्याचा हंगाम लवकर संपल्याने या नुकसानीचे प्रमाण तुलनेत कमी होती.
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा नजर पाहणी अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या 15 तालुक्यातील 227 गावांना अवकाळीचा फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार 2 हजार 344 शेतकरी बाधित झाले आहेत. आजपर्यंत 937.15 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यात कर्जत तालुक्यात सर्वाधिक 387.15 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे खरिपाच्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
आपापल्या भागातील भातपीक व फळपीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या पाहणी केलेल्या अहवाल अहवालानुसार 937.15 हेक्टर क्षेत्रावर 1 कोटी 62 लाख 59 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.
वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी