Raigad Politics : पनवेल -उरणमध्ये भाजपाची ताकत वाढणार; शेकापाचे नेते म्हात्रेंसह १५ नगरसेवक करणार भाजपात प्रवेश

Raigad Political News : पनवेल- उरणमधील राजकीय समीकरणे बदलणाऱ्याची शक्यता
Raigad Politics
पनवेल -उरणमध्ये भाजपाची ताकत वाढणार; शेकापाचे नेते म्हात्रेंसह १५ नगरसेवक करणार भाजपात प्रवेश
Published on
Updated on

Raigad Politics

पनवेल : पनवेल आणि उरण परिसरातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीचा अखेर स्फोट झाला असून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली म्हात्रे कुटुंब आणि त्यांच्या गटातील आजी माजी नगरसेवकांनी तसेच पनवेल उरणमधील सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ७ मे रोजी भाजप नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे सर्वजण भाजपात प्रवेश करणार आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना, आरोप-प्रत्यारोपांच्या नाट्याला सोमवारी (दि.५) पूर्णविराम मिळाला. शेतकरी कामगार पक्षाचे काम करणार मात्र, महाविकास आघाडीतून मी बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी तीन दिवसापूर्वी केली होती. या राजकीय नाट्याला पूर्णविराम देत आज शेकापामधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सुरेखा मोहकर यांच्यासह एकूण १५ नगरसेवक आणि सरपंचांनी जे. एम. म्हात्रे यांना पाठिंबा देत शेकापातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पनवेल आणि उरणमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणाऱ्याची शक्यता आहे.

Raigad Politics
Political News: ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ धोरण राज्यात लवकरच: चंद्रशेखर बावनकुळे

शेकाप हे पारंपरिक शेतकरी व कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दशकांपासून रायगड जिल्ह्यात शेकापची मजबूत पकड होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत संघर्ष, नेतृत्वातील मतभेद आणि कार्यपद्धतीवरील नाराजी यामुळे पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याच्या प्रकरणानंतर पनवेल आणि उरण मधील राजकारणाला वेगळे वळण लागले होते. पक्षाची इमेज मलिन झाली होती. त्यानंतर उरण विधानसभा मतदार संघातील विधानासभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मदतीमुळे पक्षात फूट पडण्याचे संकेत मिळत होते. याचा परिपाक म्हणून म्हात्रे कुटुंबासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

पक्षांतर्गत मतभेद हीच मुख्य कारणं असल्याचे सांगितले जात असले तरी भाजपकडून सतत सुरू असलेल्या "मजबूत स्थानिक नेतृत्व जोडण्याच्या" मोहिमेचा हा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने शेकापमधील नाराज गटाशी दीर्घकाळ चर्चा करून ही फूट साधली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा मोठा राजकीय डाव खेळल्याचे मानले जात आहे.

नवीन नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भाजपची ताकद अधिक वाढणार आहे. याशिवाय उरणमध्येही भाजपचा प्रभाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, शेकापसाठी ही फार मोठी पीछेहाट मानली जात आहे. म्हात्रे कुटुंब हे शेकापचे जुने, प्रभावी व निर्णयक्षम नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाला संघटनात्मक आणि कार्यकर्त्यांच्या स्तरावर मोठा धक्का बसू शकतो. याशिवाय पक्षाच्या भवितव्यासंदर्भातही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणावर शेकापच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, पक्षांतर्गत बैठका सुरू असून उर्वरित नेतृत्व नव्याने पक्ष संघटनेचे पुनर्रचनात्मक नियोजन करत असल्याचे वृत्त आहे.

शेतकरी कामगार पक्षातून भाजपात होत असलेला हा मोठा पक्षप्रवेश हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या राजकीय चित्रात बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगतो. पारंपरिक राजकारणाच्या चौकटी मोडून, भाजपने ग्रामीण व उपनगरी भागांमध्ये पाय रोवण्याची ही एक महत्त्वपूर्ण चाल ठरू शकते. ७ तारखेला होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून या नाट्यमय राजकीय घडामोडी पनवेल-उरण परिसरातील आगामी राजकारणाचा दिशा आणि दशा ठरविणार आहेत.

Raigad Politics
Political News: मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर बोलत नाहीत; माजी आमदार बच्चू कडू यांची टीका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news