

माणगाव शहराच्या हद्दीत दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे फक्त कागदावर रंगवलेले स्वप्न ठरले आहे. या केंद्राच्या मंजुरीची बातमी आली तेव्हा संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, दोन वर्षाच्या कालावधीनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटर आता ड्रामा केअर सेंटर बनले आहे. अशी उपहासात्मक टीका नागरिक करू लागले आहेत. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयालगत 34 गुंठे जागा निश्चित झाली असून याठिकाणी असणार्या पूर्वीच्या पंचायत समिती इमारतीत तालुका आरोग्य अधिकारी व सर्वशिक्षा अभियान हि दोन कार्यालये सुरु आहेत. या दोनही कार्यालयांना शासनाकडून जागा खाली करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. मात्र अद्यापही ती कार्यालये स्थलांतरित केली नसल्याने ट्रॉमा केअर सेंटरचे काम रेंगाळले आहे. ज्या ठिकाणी या केंद्राची उभारणी होणार होती. तेथे आता फक्त गवत वाढलेले दिसते. लोकांच्या अपेक्षांचा आणि स्वप्नांचा फुगाच कसा फुटतो. याचा प्रत्यय नागरिकांना येवू लागला आहे.
माणगावसारख्या शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच झलेल्या महामार्गावरील विविध अपघातानंतर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून महामार्गालगत असणार्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने योग्य उपचार उपलब्ध नसल्यामुळे अनेक निष्पाप जीव गमवावे लागले आहेत. ज्या लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला, त्यांनी सुरुवातीला मोठ्या घोषणाबाजी केल्या. माणगावच्या ट्रॉमा केअर सेंटरची अवस्था ही प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा प्रत्यय देते. माणगाव ट्रॉमा केअर सेंटर 10 खाटांचे लेवल 3 चे उभारले जाणार आहे. यात स्त्री - पुरुष स्वतंत्र कक्ष अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, डायसेस विभाग, शवविच्छेदन कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, अधिकारी कर्मचार्यांसाठी निवासस्थान असे विविध सोयीसुविधा याठिकाणी असणार आहेत. या सेंटरचे वास्तुशास्त्रज्ञाकडून आराखडा शासनानाकडे आला असून तो आता मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविला जाणार आहे. या कामाला आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र 24 फेबुवारी 2022 ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजुरीला तीन वर्ष होत आहेत. त्यामुळे या कामाला म्हणावी तितकी गती नसल्याने नागरिकांच्या भावना अधिक तीव्र होत आहेत तालुक्यासह अन्य तालुक्यातून नागरिक उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. सामान्य नागरिकांना खाजगी - महागडी रुग्णसेवा परवडत नसल्याने दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. नवनवीन उपचारासाठी लागणार्या यंत्रसामुगी, पुरेसा ऑक्सिजन साठा, डायलेसिस विभाग, यामुळे हे रुग्णालय कात टाकत आहे. माणगाव ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होणार आहे. मात्र हे ट्रॉमा केअर सेंटर गेले अनेक दिवस कागदवरच राहिले असून हे सेंटर उभारणीसाठी शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार असा प्रांजळ सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. मात्र या ट्रॉमा केअर सेंटरला 2 वर्षापूर्वी मंजुरी मिळाली असून ते आजही कागदावरच राहिले आहे.
मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्वाच्या राज्य मार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. मात्र हे ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला शासनाला मुहूर्त सापडत नसल्याने हे ट्रॉमा केअर सेंटर फक्त कागदावर उरले आहे. त्यामुळे रुग्ण व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.