

म्हसळा शहर: म्हसळा तालुक्यातील तोंडसुरेत सध्या गेल्या 25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नवीन ठेकेदार नेमण्यात यावा अशी मागणी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महादेव चांगु पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ही चार ग्रामपंचायतींच्या अंतर्गत असून या योजनेत आठ गावे व बारा वाड्यांचा समावेश आहे. मात्र या योजनेद्वारे नागरिकांना सातत्याने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.सध्या गेल्या 25 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
निवेदनात नमूद करताना त्यांनी या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या टेंडरची मुदत आता संपलेली असून यापूर्वी हे काम जयवंत आवेरे,म्हसळा यांच्याकडे होते.मात्र त्यांनी योजनेच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच त्यांच्याकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने छोट्या दुरुस्तीच्या कामांनाही अनेक दिवस लागत असल्याने पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यामुळे भविष्यात नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यासाठी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे नवीन टेंडर देताना नवीन सक्षम ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महादेव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यात सध्या कडक उन्हाळा सुरु आहे.त्यात पाण्याचीही टंचाईही जाणवते आहे.त्यामुळे तोंडसुरे परिसरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे.