

तळा : संध्या पिंगळे
तळा तालुका हा दुर्गम डोंगराळ असून तालुक्यात गावागावापर्यत पोहचलेले रस्ते हे दळणवळणासाठी आधार ठरत आहेत. रस्ते हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत असून जे लोकांना जलदगतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहचण्यास मदत करत असतात.
यामधे प्राचीन काळातील पायवाटा व आताच्या आधुनिक काळातील महामार्ग व इतर रस्ते यामुळे तळा तालुक्यातील दळणवळण सुविधा चांगल्या झाल्या आहेत. याचा फायदा विविध वहानांसाठी, मालवाहतुकीसाठी, सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने यांचा उपयोग होत असतो.
तालुक्यात रस्त्यांचे जाळे पसरले असून प्रत्येक गाव तळा - इंदापूर, तळा - मांदाड - रोवळा - मजगाव - म्हसळा व तळा - तळेगाव - उसर या मुख्य रस्त्यांना जोडल्याने गावागावांतील नागरिकांना प्रवास करताना, व उद्योगधंदे, व्यवसाय, नोकरी साठी सहजगत्या माणगाव, रोहा व मुंबई, पुणे सारख्या शहरांकडे जाता येत आहे. तळा तालुक्यासाठी इंदापूर - तळा - आगरदंडा हा रस्ता दीघीबंदराच्या दृष्टीने झाला असल्याने उद्योग व्यवसाय चालना मिळत आहे.
जवळ जवळ बहुतेक भागात लालपरी पोहचली असल्याने दळणवळणाचे मुख्यसाधन हे लाल परी ठरत आहे. त्यामुळे प्रवास सोपे झाले आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना होत आहे. रस्ते झाल्याने व लाल परी असल्याने इतर ठीकाणी अथवा गावात सामान आणायचे झाल्यास खर्च कमी होऊन आर्थिक बचत होत असते. यात नागरिकांशी संवाद साधला असता रस्ते चांगले असल्याने लालपरीचा आर्थिक दृष्ट्या चांगला फायदा होत असल्याचे म्हटले आहे.
तालुक्यातील तळा - तळेगाव रस्त्याचे दुरुस्तीचे काम होणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून म्हटले जात आहे. तसेच तळा तालुक्यातील पर्यटनास साह्यभूत असलेल्या वावेहवेली धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्ता दुरुस्त होणे आवश्यक आहे व माळाठेवाडी या द्रोणोबाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कठडे होणे आवश्यक असल्याचे पर्यटकांतून म्हटले जात आहे. तालुक्यात लाल परी हे मुख्य दळणवळणाचे साधन असले तरी काही भागात खाजगी वहानानेही प्रवास करता येत आहे. जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विस्तारण्याची गरज आहे.