Raigad News : रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात संशयित बोट, पोलीस यंत्रणा अलर्टवर
रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल (साधारण साडे पाच किलोमीटर अंतरावर) एक संशयीत बोट दिसली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पाकिस्तानची बोट असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात दिसत असलेली बोट ही पाकिस्तानची असल्याची चर्चा ही रेवदंडा सहित जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुपारपर्यंत तरी अशी कुठलीही संशयास्पद बोट आढळलेली नाही. तथापि यंत्रणांकडून बोटीचा शोध सुरूच आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
नौसेना तटरक्षक दलाचा संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
बोट ही समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल खोल समुद्रात ही बोट आढळली असून वादळी वातावरणामुळे या बोटीपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही. यामुळे आता नौसेना तटरक्षक दलाच्या बोटीमधून त्या संशयित बोटीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सुरक्षा यंत्रणा अर्लटवर
संशयास्पद बोटीबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीसांना माहिती दिली. यानंतर रायगड पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (QRT), नौदल आणि तटरक्षक दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह किनाऱ्यावर पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. स्वतः पोलीस अधीक्षक दलाल यांनी एका बार्जच्या साहाय्याने बोटीजवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु खराब हवामानामुळे त्यांना परतावे लागले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जिल्ह्याच्या एकूण सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रायगडचे पाेलीस पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिकांबरोबर चर्चाही केली. सुरक्षा यंत्रणा अर्लटवर असून, शोधमोहिम सुरु आहे.

