

अलिबाग: राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी नियुक्त असलेल्या ज्या शिक्षकांचा पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे, अशा शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ची मुदत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यात २८ जून रोजी टीईटी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून एकूण १० हजार २०३ शिक्षक ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर 1साठी ४ हजार ४३२ विद्यार्थी, पेपर २ साठी ५ हजार ७७१ शिक्षक असे एकूण १० हजार २०३ शिक्षक प्रविष्ठ आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षा वर्गखोल्यांसह परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार व केंद्र संचालकांच्या कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
परीक्षा केंद्रावर आधार बायोमॅट्रीक व फ्रीस्कींग होणार असल्यामुळे परीक्षार्थीनी पेपर १ साठी सकाळी ८.३० वाजता व पेपर २ साठी १२.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहायचे असून सकाळच्या पेपरला सकाळी १०.१० मिनिटानंतर आणि पेपर २ साठी दुपारी २.१० मिनिटानंतर कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी फ्रिस्किंगकरीता ७० उमेदवारांसाठी एक तंत्रज्ञ आणि बायोमेट्रिक हजेरीसाठी ७५ उमेदवारांसाठी एक तंत्रज्ञ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक (युनिक नंबर) व क्युआर कोड असणार आहे.
त्याचप्रमाणे गोपनीय साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाल्यापासून ते परीक्षा संपल्यानंतर कंट्रोल रूमला जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डींग व सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये होणार आहे. ज्या दिव्यांग परीक्षार्थीना लेखनिक घ्यावयाचा असेल, त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडून तशी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी सूचना
परीक्षेला जातांना परीक्षार्थीनी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्राची मूळ व सत्यप्रत सोबत ठेवावे. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल, पेजर, डिजीटल घड्याळ, पेन इत्यादी नेण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्हीचा अनिवार्यपणे वापर करण्यात येणार असल्याने संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा.
उत्तर पत्रिकेसोबत दोन कार्बन कॉपी असणार आहेत. एक कार्बन कॉपी उमेदवारांसाठी असेल व दुसरी कार्बन कॉपी परीक्षा परिषदेची असेल. परीक्षेमध्ये प्रत्यक्षात किती प्रश्न सोडविले? याबाबतची संख्या उत्तरपत्रिकेमध्ये अनिवार्यपणे नमूद करावयाची आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता
जिल्हा कोषागारापासून ते केंद्रस्थळी परिक्षेचे साहित्य
पोहोचेपर्यंत व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे.
वर्गखोल्या, केंद्राचे प्रवेशद्वार, केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणार.
उमेदवारांच्या तपासणीकरीता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग इ. सुविधा.
परिक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्त.
परिरक्षक व केंद्रसंचालकांची नियुक्ती