

संतोष उतेकर
सुधागड: सुधागड तालुक्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे आणि उन्हेरे ही सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील निसर्गसौंदर्य खुलले असून, हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
तालुक्यातील सर्वच धरण परिसरात सद्यस्थितीत पाण्याचे मनमोहक प्रवाह वाहताना दिसत आहेत. विशेषतः कोंडगाव धरणाला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे. धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या सुरक्षित पाण्यात भिजण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक कुटुंबासह येथे दाखल होत आहेत. सुट्टीच्या दिवशी या पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
स्थानिकांना रोजगाराची संधी
धरण परिसरात पर्यटकांचा राबता वाढल्यामुळे स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कोंडगाव येथील व्यावसायिक राम तुपे यांनी सांगितले की, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत.
निसर्गरम्य वातावरण आणि वाहणारे पाणी पर्यटकांना विशेष आकर्षित करत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि इतर व्यापाऱ्यांच्या व्यवसायात चांगली वृद्धी झाली असून, या पावसाळी पर्यटनामुळे स्थानिक अर्थकारणाला मोठा दिलासा मिळाला आहे.