

खोपोली: रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध निर्मितीला आळा घालण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाने आता अधिक आक्रमक आणि प्रभावी मोहीम हाती घेतली असून, अंमली पदार्थांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्री कर्सर केमिकलच्या गैरवापरावर कठोर नियंत्रण आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर न रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीपीएस कायदा व कर्सर केमिकलच्या संदर्भात भव्य समन्वय व जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत एनडीपीएस कायद्याच्या विविध तरतुदी,प्री कर्सर केमिकलचे उत्पादन,साठवणूक, वाहतूक,वितरण व वापर यासंबंधीचे नियम,तसेच रसायनांच्या खरेदी-विक्रीचे अभिलेख व कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबाबत उद्योगांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
रसायनांची बेकायदेशीर वळवणूक कारखान्यांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था,साठ्यांवर काटेकोर नियंत्रण आणि संशयास्पद हालचालींवर सतत देखरेख ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून रसायनांची मागणी, संशयास्पद व्यवहार अथवा गैरवापराची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस खालापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल,रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ संबंधित पोलीस अधिकारी तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योग प्रतिनिधींनी एनडीपी एस कायद्याचे काटेकोर पालन करण्या बरोबरच रसायनांचा गैरवापर आणि बेकायदेशीर वळवणूक रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
रायगड जिल्हा पोलीस दलाने भविष्यातही उद्योग क्षेत्राशी सातत्याने समन्वय साधत अंमली पदार्थांविरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती अभियान आणि अशा समन्वय बैठका नियमितपणे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त ठेवण्यासाठी उद्योग आणि पोलीस यांची ही संयुक्त मोहीम निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
३० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित
तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे 30 औद्योगिक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.अंमली पदार्थांच्या साखळीला सुरुवातीलाच खीळ घालण्यासाठी उद्योग आणि पोलीस प्रशासन यांच्यात अधिक मजबूत समन्वय निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्री कर्सर केमिकल वर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही केवळ पोलीस प्रशासनाची नव्हे,तर उद्योग क्षेत्राचीही संयुक्त जबाबदारी आहे.संशयास्पद व्यवहार,अनधिकृत मागणी किंवा रसायनांचा गैरवापर आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या.उद्योग आणि पोलीस यांच्यातील सशक्त समन्वयामुळे एनडीपीएस कायद्याची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल.
- आंचल दलाल, पोलीस अधीक्ष