Raigad News : आमणोली गावाकडे जाणारा पूल कोसळला

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या डम्परमुळे दुर्घटना; जीवितहानी टळली
Sudhagad Bridge Collapse
आमणोली गावाकडे जाणारा पूल कोसळलाpudhari photo
Published on
Updated on

पाली : शरद निकुंभ

सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा पूल 13 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची गंभीर घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या डम्परमुळे हा पूल कोसळल्याचे समोर आले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे पुढील गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जांभूळपाडा मार्गावरून आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा व एकमेव मार्ग मानला जातो. कमी वजन क्षमतेचा आणि आकाराने लहान असलेला हा पूल मुख्यत्वे प्रवासी वाहतुकीसाठी वापरला जात होता. मात्र गेल्या काही काळापासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड मालवाहतूक वाहने अवैधरित्या सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती.

Sudhagad Bridge Collapse
बेफाम वेग, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, रखडलेला महामार्ग, एसटीचा अनियंत्रीत ताळमेळ सर्वसामान्यांच्या जिवावर

बुधवारी खडीने भरलेला डम्पर पुलावरून जात असताना अचानक पुलाचा भाग खचला आणि डम्परसह पूल कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने चालकासह अन्य कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आलेला असताना पूल कोसळल्यामुळे ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. काही दिवसांत शाळा व महाविद्यालये सुरू होणार असून विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा आणि शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला असून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात संबंधित विभाग अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Sudhagad Bridge Collapse
Illegal Firecracker Factory Blast: अवैध फटाका उद्योगात स्फोट; 2 ठार

घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी संबंधित वाहन चालक, मालवाहतूक करणारे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर

या प्रकरणी संबंधित वाहन चालक, मालवाहतूक करणारे कंत्राटदार तसेच जबाबदार विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुलाच्या दुर्घटनेमुळे परिसरातील इतर जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news