

माणगाव ः कमलाकर होवाळ
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. सहा महिन्यांपासून चाललेल्या अखंड पावसाने आणि चार वेळा आलेल्या महापुराने आधीच थकलेल्या बळीराजाला आता या नव्या पावसाच्या फटक्याने गुडघे टेकायला भाग पाडले आहे.
उभ्या पिकांना झोडपून काढणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. रायगडसह माणगाव, रोहा, महाड आणि आसपासच्या भागात भात, भाजीपाला, फळबागा, कडधान्ये सगळंच पाण्याखाली गेले आहे. शेतात उभ्या भाताच्या रोपांना पुन्हा कोंब आले आहेत, जमिनीत पाणी साचून सर्वत्र चिखलच चिखल झाले आहे. पिके कुजून गेली आहेत, तर जनावरांसाठीचा चारा, पेंढाही भिजून निकामी झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या जागा पाण्याने वाहून गेल्या असून जमिनीसुद्धा नापीक झाली आहे.
इतकं काही भोगूनही आम्ही पुन्हा शेती केली. पण आता काहीच शिल्लक नाही, असे अश्रू ढाळत सांगणाऱ्या माणगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शब्द कानात रेंगाळतात. शेतकरी हवालदिल आहेत. एकीकडे पिकांचं नुकसान, तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते, घरच्यांची जबाबदारी, जनावरांना चाराच नाही. या सगळ्यात त्यांचा विश्वास ढळतोय. या भीषण परिस्थितीची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी सुरू केली आहे.