

रायगड : किशोर सुद
रायगडातील दहा नगरपालिकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र या प्रचाराकडे सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तर स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची धुरा असल्याने त्यांनाही जिल्हयाबाहेर जात येत नसल्योच दिसत आहे. जाहीर प्रचार सभांपेक्षा घरोघरी, दारोदारी मतदारांना भेटण्यावरच उमेदवारांचा जास्त भर आहे. निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी एक दिवसाने वाढविला आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी एक डिसेंबरला वाहनांच्या रॅली काढून राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान या दहा नगरपरिषदांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हयातील दहा नगरपरिषदांमधील दहा नगराध्यक्ष पद 34 आणि 209 नगरसेवक पदांसाठी 595 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महायुती तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- शिवसेना उबाठा गट अशी महाविकास आघाडी आहे. मात्र जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांमध्ये सोयी प्रमाणे युत्या आणि आघाड्या झालेल्या पहायला मिळत आहेत.
उमेदवार अर्ज माघारी आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. युती आणि आघाडीच्या नेते आणि उमेदवारांनी आपआपल्या विभागात जोरदार प्रचार सुरु केला आहे. जिल्हयातील सत्ताधारी सर्व खासदार-आमदार प्रचारात उतरले आहेत. काही नगरपरिषदांमध्ये युतीसह आघाडीतील घटक पक्ष एकमेकाविरोधात उभे ठाकल्याने प्रचाराची धार वाढत आहे.
कर्जतमध्ये युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री आशिष शेलार, तर मंत्री शंभुराज देसाई यांचा माथेरानमध्ये प्रचार दौरा झाला आहे. मात्रा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पेणमधील प्रचारदौरा रद्द झाला. तर महाडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यांचाही अद्याप प्रचार दौरा झालेला नाही. आता जाहीर प्रचारासाठी तीन दिवस बाकी असल्याने प्रचाराची धुरा स्थानिक पातळीवर नेतेच सांभाळीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हयात विविध पक्षांचे स्टार प्रचारक निवडणूक प्रचाराच उतरतील असे सुरुवातीला दिसत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेणमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी येतील असे सांगितले जात होते, मात्र अद्याप त्यांची पेणमध्ये सभा झालेली नाही. तर महाडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याचे सांगितले जात होते. एकनाथ शिंदे यांचीही जिल्हयात प्रचार सभा झालेली नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळता राज्यातील मोठे नेते जिल्हयात प्रचारासाठी फिरकलेले दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे.