ST Employee Strike | ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरी रुसली

रायगडमधील महाड, माणगाव, रोह्यातील एसटी सेवेवर परिणाम
ST Employee Strike
रायगडमधील महाड, माणगाव, रोह्यातील एसटी सेवेवर परिणामpudhari photo
Published on
Updated on

रायगड : शासकीय नियमानुसार कर्मचार्‍यांना वेतन मिळावे या व इतर प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून (3 सप्टेंबर) बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे रायगड जिल्हयातील पनवेल, महाड, माणगाव, रोहा आगारांतील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. संपामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्याच्या तयारीत असलेले नागरिक चिंतेत पडले आहेत. तर एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी संघटनांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या संपाचा निर्णय बुधवारीच होण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या

Summary
  • शासकीय नियमानुसार कर्मचार्‍यांना वेतन मिळावे खाजगीकरण बंद करावे.

  • सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करावी

  • इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करावी

  • जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाकाव्यात व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी कराव्यात.

  • चालक- वाहक- कार्यशाळा व महीला कर्मचार्‍यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्यावी.

  • वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात.

  • सेवानिवृत्त झालेल्या व होणार्‍या कर्मचाफर्‍यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर कराव्यात. इत्यादी.

महाराष्ट्रातील एसटीच्या कर्मचार्‍यांनी 2021 मध्ये मोठे आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जवळपास दोन महिने बसेस बंद होत्या. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संप सुरु केला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने 3 ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू केला आहे.

ST Employee Strike
ST Employee Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

याबाबत बोलताना कर्मचारी संघटनेच्या वतीने शासकीय नियमानुसार कर्मचार्‍यांना वेतन मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. 7 ऑगस्ट रोजी याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 ऑगस्टपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटून गेली तरीही कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचार्‍यांच्या विविध 13 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून (3 सप्टेंबर) बेमुदत संप सुरू केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका कर्मचार्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील 251 आगारापैकी 35 आगारे पूर्णत: बंद झाली आहे. रायगड जिल्हयातील पनवेल, महाड आदी स्थानकांमध्ये संपचा परिणाम दिसून आला. याचे परिणाम म्हणून आगारात सर्व असतील आणि एसटीतून प्रवास करणारे प्रवासी खोळंबले आहेत.

त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्याच्या तयारीत असलेले नागरिक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी संघटनांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यानंतरच संप समाप्त मागे घेण्यात येईल अथवा पुढे चालू राहिल याचा निर्णय होणार आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या विविध 13 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने बेमुदत संप सुरू केला आहे.

रायगड एसटी विभागात आठ आगार आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या आजच्या राज्यव्यापी संपामुळे रायगड विभागातील महाड, माणगाव, रोहा येथील सेवा विस्कळीत झाली आहे. तरीही येथील अंशत वाहतूक सुरु आहे. उर्वरित आगारांच्या स्थानकांतून एसटी वाहतूक सुरळीत सुरु आहे.

दीपक घोडे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड

गैरसोय टाळण्याचे महामंडळाचे आवाहन

उद्या (4 सप्टेंबर) संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावले आहे. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news