अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : फलटणजवळच्या सोनवडी या गावातील कोळसा भट्टीवर कोळसा गोणींमध्ये भरण्याचे काम करणार्या महिलेवर 19 जून रोजी सामूहिक बलात्कर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला जांभूळपाडा (जि. रायगड) जवळील वांद्रोशी गावातील कातकरी समाजातील आहे. कोळसा उत्पादन करणारा भट्टीमालक हसन लतिफ शेख याच्यासह पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. यावेळी पतीला बाजूच्या झोपडीत डांबून ठेवले होते तर अन्य कातकरी कुटुंबांना बाहेर आल्यास ठार मारू, अशी धमकी दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित महिला 28 वर्षांची असून तिला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. ती कातकरी समाजातील असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील राहण्यास आहे. पीडित महिला आणि तिचा नवरा, सासू-सासरा आणि मुलं हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादित करणार्या कारखान्यात कामाला होते. अत्याचारानंतर या पीडित महिलेला या पाच जणांनी मारहाण केली. त्यावेळी तिने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले आणि पडून राहिली. त्यानंतर पाच नराधम झोपडीतून निघून गेले. या संधीचा फायदा घेऊन ती झोपडीतून बाहेर आली आणि सकाळी सहा वाजेपर्यंत शेजारच्या उसाच्या शेतात लपून बसली. सकाळी पती हाक मारत आल्यावर ती उसाच्या शेतातून बाहेर आली.
दरम्यान, पीडितेच्या दोन मुलांना हसन शेखने त्यांच्या घरी डांबून ठेवले होते. तो आपल्याला ठार मारेल या भीतीने घाबरलेली पीडित महिला, तिचा पती आणि पाच वर्षाची मुलगी यांनी त्या कोळसा भट्टीवरून निसटून बसने पंढरपूरला आले. तेथून ट्रेनने लोणावळ्यास आले. पैसे संपल्याने तेथे दोन दिवस बिगारी काम करुन एक हजार रुपये मजुरी मिळवली. त्या पैशातून जांभूळपाड्याजवळच्या मुळशी गावात काकांच्या घरी पोहोचले. काकांनी घडलेला गंभीर प्रकार शेजारील आडोशी गावात राहणारे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते रमेश वाघमारे यांना सांगितल्यावर त्यांनी या दाम्पत्याला विरार जवळच्या उसगाव येथील संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्याकडे नेले. विवेक पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर पीडितेचा जबाब मांडवी पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रफुल्ल वाघ यांनी नोेंदवून घेतला. शुक्रवारी पहाटे सातारा पोलिसांनी पीडित महिलेला आणि तिच्या पतीला सातार्याला तक्रार दाखल करण्याकरिता नेले असल्याची माहिती विवेक पंडित यांनी दिली आहे.