

सावंतवाडी : जागतिक स्तरावर आयोजित ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या पक्षी गणनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या पक्षी गणनेत जिल्ह्यात पक्षांच्या तीन नवीन प्रजातींची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण पक्षी प्रजातींची संख्या 428 झाली आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या निसर्गवैविध्यात मोलाची भर पडली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधून एकूण 40 निरीक्षकांनी 45 वेगवेगळ्या ठिकाणी हे पक्षी निरीक्षण केले. ओरोस येथील पक्षी निरीक्षक सचिन प्रभू यांनी राज्यात सर्वाधिक 264 प्रजातींची नोंद केली. त्याखालोखाल मकरंद नाईक (233), प्रवीण सातोसकर (230) यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
यावर्षीच्या पक्षी गणनेत सिंधुदुर्गातील पक्षी प्रजातींची संख्या 428 झाली आहे. यात तीन नव्या प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये लार्ज हॉक-कुकू (मोठा पावश्या): तळकट वनउद्यान येथे प्रवीण सातोसकर व त्यांच्या टीमने या दुर्मिळ प्रवासी पक्षाची नोंद केली. रेड-क्रेस्टेड पोचार्ड (मोठी लालसरी बदक):तेरवण-मेढे धरण आणि तिलारी परिसरात मकरंद नाईक यांनी या प्रवासी बदकाची नोंद केली. हा पक्षी मूळचा मध्य आशिया आणि मंगोलियामधील आहे. एशियन टिट (कवडी रामगंगा): चौकुळ येथे प्रवीण सातोसकर यांनी या पक्षाची नोंद केली. हा पक्षी प्रामुख्याने घाट माथ्यावर आढळतो. कोकणात त्याच्या नोंदी नाही आहेत.
जिल्ह्यातील पक्षी निरक्षणाची प्रमुख ठिकाणे सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर, कुडासे-वानोशी, बांदा, तिलारी, तळकट, शिरोडा, मालवण, मोचेमाड, देवगड, चिपी, ओरोस व पाट तलाव या प्रमुख ठिकाणी हे निरीक्षण करण्यात आले. या मोहिमेत वाईल्ड कोकण, मृगया नेचर एक्सपीडिशन, वानोशी फॉरेस्ट होम स्टे, वनश्री फाउंडेशन आणि युथ बिट फॉर क्लायमेट चेंज या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पक्षांच्या संख्येतील बदल, स्थलांतर आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी उेीपशश्रश्र ङरल ेष जीपळींहेश्रेसू आणि इळीवङळषश खपींशीपरींळेपरश्र मार्फत ही गणना दरवर्षी जागतिक स्तरावर केली जाते. सिंधुदुर्गच्या या यशामुळे जिल्ह्याच्या निसर्ग पर्यटनाला आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
या जागतिक स्पर्धेत पुणे जिल्हा 267 प्रजातींसह दुसऱ्या, तर रायगड 210 प्रजातींसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 13 ते 16 फेब्रुवारी दरम्यान जगभर राबवण्यात आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता.