

विजय कांबळे
कापोली: पर्यटनाच्या दृष्टीने आणि मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन येथील एसटी आगाराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवी भरती न झाल्याने चालक-वाहकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यातच इतर आगारांतून आणलेल्या भंगार, आणि जुन्या बसेस प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत.या गंभीर समस्येकडे स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील जनतेमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रीवर्धन स्थानकातील मुख्य मुद्दे आणि कडक वास्तव म्हणजेच स्थानक प्रमुखांची हतबलता या गंभीर परिस्थितीवर जेव्हा श्रीवर्धन स्थानक प्रमुखांना जाब विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी थेट प्रशासकीय अपयश चव्हाट्यावर आणले.
"वरिष्ठ पातळीवरूनच जर वाहन चालक आणि बसेस दिल्या जात नसतील, तर आम्ही स्थानिक पातळीवर काय करणार? संपूर्ण महाराष्ट्रातच नवीन भरती रखडली आहे, मग गाड्या चालवायच्या कशा?" असा हतबल सवाल स्थानक प्रमुखांनी केला आहे. यावरून एसटी महामंडळाचा एकूणच सावळागोंधळ समोर आला आहे.
प्रवाशांकडून आता परिवहन मंत्र्यांकडे थेट साकडे घालत स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हतबल ठरल्यामुळे आता थेट परिवहन मंत्र्यांनीच प्रवाशांच्या भावना आणि हाल लक्षात घ्यावेत.त्यांनी तातडीने महाराष्ट्र पातळीवर नवीन चालक-वाहक भरती प्रक्रिया राबवून श्रीवर्धन डेपोसाठी नवीन बसेस ताबडतोब उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी जनता करत आहे.ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची कोंडी होत आहे.
कोकणचा सर्वात मोठा सण असलेल्या गौरी-गणपतीसाठी प्रवाशांकडून गेल्या महिन्यापासून प्रचंड मागणी असूनही हव्या तशा जादा बसेस लावल्या जात नाहीत. चाकरमानी दोन महिने आधीपासून आगाऊ तिकीट बुकिंग करत असतात, तरीही डेपो प्रशासन प्रवाशांच्या भावना पायदळी तुडवून या नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
मुंबईच्या फेऱ्या खोळंबल्या!
श्रीवर्धन स्थानकातून, बोरीवली,नालासोपारा आणि विठ्ठलवाडी (कल्याण) कडे रवाना होणाऱ्या बसेस वाहन चालक कमी असल्यामुळे तासन्तास उशिराने धावत असतात. रातराणी आणि काही सकाळच्या बसेस देखिल बसेस व चालक-वाहक नसल्याने बंद करण्यात आल्या आहेत.मुंबईसाठी प्रवाशांनी वारंवार हक्काच्या नवीन बसेस, सकाळच्या फेऱ्या आणि 'रातराणी' (नाईट बस) सुरू करण्याची मागणी पत्रकारांनी देखिल केली आहे.
मात्र, "पुरेश्या बसेस व वाहन चालक आणि वाहक उपलब्ध नाहीत" हे एकच कारण पुढे करून या फेऱ्या सुरू केल्या जात नाहीत. पत्रकारांनी आज अधिक माहितीसाठी स्थानक प्रमुख व आगार प्रमुखांशी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही मोबाईल बंद दाखवत होते.
शांत कोकणी माणूस आता पेटणार!
कोकणातील जनता स्वभावतः शांत आणि सोशिक आहे. आजवर अनेक अडचणी सहन करत, फक्त व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया ग्रुपवर चर्चा करून शांत बसणारी जनता आता प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारण्याच्या मनस्थितीत आहे.
जनतेच्या या संयमाचा अंत आता पाहू नये, असा इशारा दिला जात आहे. डेपोत भंगार गाड्यांचा सुळसुळाट: श्रीवर्धन डेपोमध्ये इतर ठिकाणच्या डेपोतून आणलेल्या जुन्या आणि गळक्या बसेस चालवल्या जात आहेत.पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांना आत चक्क पैसे देऊनही जागा शोधून बसावे लागते, अशी भीषण स्थिती आहे.
आता केवळ ग्रुपवर चर्चा नाही, थेट परिवहन मंत्र्यांकडे दाद!""आता तर खुद्द स्थानक प्रमुखच हतबल झाले आहेत. जर राज्यामध्ये भरतीच होणार नसेल, तर आमच्या हक्काच्या लालपरीचे काय होणार? आमच्या हक्काच्या बाप्पाच्या सणालाही जर आम्हाला लालपरी मिळणार नसेल, तर मंत्रालयासमोर दाद मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही!
- धनंजय चौलकर, संतप्त श्रीवर्धनवासीय व मुंबईकर
मंत्री अदिती तटकरे यांनी हिरकणी कक्षाचे नुकतेच उद्घाटन केले असून आपल्या श्रीवर्धन मतदारसंघातील श्रीवर्धन डेपो मधून सुटणाऱ्या गाड्या सुसज्ज स्थितीत नाहीत. पुरेश्या बसेस व चालक-वाहक नाहीत त्याकडेही लक्ष द्यावे, त्याबरोबर श्रीवर्धन स्थानकातून सुटलेली एसटी बस नियोजित वेळेत त्या ठिकाणी पोचेल कि नाही याची काहीच शाश्वती नसते याकडेही मा आमदार व खासदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
- सुनील रिकामे, नागलोली
गाड्या आणि चालक नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे. आमच्या हक्काच्या सणालाही लोकप्रतिनिधींना जाग येत नसेल, तर या लोकप्रतिनिधींचा काय फायदा?
- संतप्त श्रीवर्धनवासीय व मुंबईकर कोकणवासी