

श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची आरक्षण आणि सोडत प्रक्रिया बुधवारी ( 8 ऑक्टोबर) दुपारी उत्साहात पार पडली. या सोडतीकडे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. महेश पाटील उपस्थित होते.या आरक्षणात अनेक इच्छुकांचे प्रभाग आरक्षित झाले तर काहींना लॉटरीही लागल्याने कही खुषी,कही गम म्हणण्याची वेळ अनेकांवर आली.
सकाळपासूनच शहरात उत्सुकतेचे वातावरण होते. आपल्या प्रभागात आरक्षण लागले तर मैदानात उतरणं ठरलेच! असे संवाद सर्वत्र ऐकू येत होते. दुपारी निकाल जाहीर होताच काहींच्या चेहर्यावर आनंदाची लकेर, तर काहींच्या चेहर्यावर निराशेची छटा दिसून आली. मात्र, या सोडतीनंतर श्रीवर्धनच्या राजकारणात नव्या समीकरणांची पायाभरणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोडतीचा निकाल प्राधिकृत अधिकारी तथा प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. या सोडतीनंतर श्रीवर्धन शहरात राजकीय चर्चांचा जोरदार सिलसिला सुरू झाला आहे. काही प्रभागांत महिलांना अधिक संधी, तर काही ठिकाणी मागास प्रवर्गासाठी नवी दारे खुली झाली आहेत. स्थानिक पातळीवर संभाव्य उमेदवारांनी आता आपल्या प्रचार रणनितीला सुरुवात केली असून, कोणत्या प्रभागात कोण उतरते, आणि कोणते गठबंधन घडते? याची उत्सुकता नागरिकांत वाढली आहे.
आरक्षण ठरलं, आता खरी लढाई सुरू होणार,असं एका स्थानिक कार्यकर्त्याने समाधानाने सांगितलं. आजची सोडत श्रीवर्धन नगरपरिषदेच्या राजकारणात नवी दिशा, नवा उत्साह आणि नवा रंग घेऊन आली आहे. आता फक्त एकच प्रश्न सर्वत्र घुमतोय कोण होईल 2025 मध्ये श्रीवर्धनचा नगरसेवक?