

श्रीवर्धन : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत श्रीवर्धन तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली शववाहिनी गेल्या सात महिन्यांपासून चालकाविना असून, ही बाब प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत आहे. गुरुवार, दिनांक 26 जून रोजी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात ही शववाहिनी दाखल झाली होती. मात्र आजतागायत या अत्यावश्यक सेवेकरिता स्वतंत्र चालकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे तिचा वापर होतच नसल्याचे जाणवत आहे.
शववाहिनी उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेक दिवस हे वाहन चालकाविना रुग्णालयाच्या परिसरात निष्क्रिय अवस्थेत उभे होते. परिणामी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना मृतदेह स्मशानभूमीपर्यंत किंवा रुग्णालयातून घरी नेण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. शासनाने अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेल्या शववाहिनी सेवेचा लाभ मिळावा, यासाठी नातेवाईकांकडून मागणी वाढल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रुग्णवाहिकेचा चालक शववाहिनी चालविण्यासाठी वापरण्यात येऊ लागला. परंतु ही व्यवस्था पूर्णतः अयोग्य व धोकादायक ठरत आहे.
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सध्या 102 क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी कंत्राटी चालकांची मुदत संपल्याने या दोन्ही रुग्णवाहिकांची जबाबदारी सध्या केवळ एका चालकावर आहे. तालुक्यातील दुर्गम खेडेगावातून रुग्ण आणणे, तातडीच्या उपचारासाठी शहरात हलविणे आणि त्याच वेळी शववाहिनी सेवा देणे, हे सर्व काम एकाच चालकाकडून करून घेतले जात आहे. ही बाब वैद्यकीय सेवा नियमावली, कामगार कायदे तसेच मानवी संवेदनांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून मृत्यूनंतरही सन्मानपूर्वक सेवा देणे ही शासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शववाहिनी सेवेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, वेळापत्रक व यंत्रणा असणे आवश्यक आहे. तरीही सात महिने उलटून गेल्यानंतरही संबंधित विभागाने चालक नियुक्तीबाबत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, हे प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतकअसल्याची टीका होत आहे.
शववाहिनी सेवेसाठी मृत व्यक्तीचे नातलग अंत्यसंस्काराची वेळ ठरवून रुग्णालयात नोंदणी करतात. मात्र अनेकदा रुग्णवाहिकेवरील एकमेव चालक रुग्णाला पुढील उपचारासाठी बाहेरगावी नेलेला असल्यामुळे नियोजित वेळेत शववाहिनी उपलब्ध होत नाही. यामुळे शोकाकुल कुटुंबीयांना मानसिक तणाव, विलंब आणि अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
सद्यस्थितीत शववाहिनी सेवेसाठी स्वतंत्र चालक उपलब्ध नसल्यास, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेवरील चालकाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शववाहिनीसाठी कायमस्वरूपी चालक नियुक्तीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी आवश्यक पत्रव्यवहार सुरू असून, याबाबत लवकरच सकारात्मक व ठोस कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
कौस्तुभ केळस्कर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक