

प्रसाद पाटील
वरंध: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या पावसाळी पर्यटनाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेल्या शिवथरघळ येथील प्रसिद्ध धबधबा मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णपणे प्रवाहित झाला आहे.
धबधबा सुरू झाल्याने परिसराच्या निसर्गसौंदर्यात आणखीनच भर पडली असून, चोहोबाजूला पसरलेले हिरवेगार डोंगर, अंगावर शहारे आणणारे धुक्याची चादर आणि कोसळणारा धबधबा यामुळे शिवथरघळ परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.
पावसाळ्याच्या प्रारंभीच धबधबा प्रवाहित झाल्यामुळे स्थानिकांसह निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी विकेंड आणि सुट्ट्यांच्या काळात मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने पर्यटकांनी धबधब्याजवळ जाताना आणि पाण्यात उतरताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे माहेरघर शिवथरघळ हे केवळ एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ नसून, महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.
संत समर्थ रामदास स्वामी आणि 'दासबोध' ग्रंथाचा इतिहास
याच ऐतिहासिक गुहेमध्ये (घळ) महाराष्ट्राचे संत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले होते. समर्थ रामदास स्वामींनी याच पावन आणि शांत भूमीत मानवी जीवनाला आणि समाजाला योग्य दिशा देणाऱ्या 'दासबोध' या अजरामर ग्रंथाची निर्मिती केली.
शिवथरघळ ही दासबोध ग्रंथाची जन्मभूमी मानली जात असल्याने वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक, अभ्यासक आणि पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात येथील मनमोहक धबधबा प्रवाहित झाल्यानंतर शिवथरघळचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक रूप अधिकच खुलून दिसते. त्यामुळे इतिहासप्रेमी, वारकरी, निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी (Photographers) हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.