

किल्ले रायगड : 352 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर एक लाख पेक्षा जास्त शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेला शिवराज्याभिषेक दिन हा देशाच्या इतिहासातील सोनेरी पान असल्याचे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किल्ले रायगडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंत्री भरत शेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांची महता ही आगामी 50 हजार वर्षापर्यंत कायम राहील पुसली जाऊ शकत नाही अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मागील 32 वर्षापासून किल्ले रायगडावर तिथीनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. चालू वर्षी राज्य शासनाने हा राज्याभिषेक सोहळा संपूर्णपणे शासकीय इतनामात साजरा करण्याचे घोषित केल्याने या कार्यक्रमाकरिता हजारो शिवभक्तांनी एकच गर्दी किल्ले रायगडावर केल्याचे आज पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, उद्योग मंत्री उदय सामंत, यांसह गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार मंगेश चव्हाण, विकास शेठ गोगावले , सुषमा गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तहसीलदार महेश शितोळे, डी वाय एस पी शंकर काळे, महाडच्या गटविकास अधिकारी डॉक्टर दीप्ती पाटील, यांसह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सुमारे वीस मिनिटाच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 352 वर्षांपूर्वी राज्याभिषेक करून घेताना स्वतःला राजा सम्राट न बनवता एक विश्वस्त म्हणून ही जबाबदारी स्वीकारली होती असे मत व्यक्त केले. छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक दिन देशाच्या इतिहासातील सोनेरी पान असून चंद्र सूर्य असेपर्यंत हे सिंहासन कायम सर्वांना प्रेरणा देत राहील असे त्यांनी सांगितले. आपले राज्य रयतेचे राज्य म्हणून त्यांनी कार्यरत ठेवताना स्वराज्य निर्मितीसाठी केवळ ते महाराष्ट्राचे राजे नव्हते तर त्यांच्या प्रगतिशील नेतृत्व गनिमी कावा लष्करी कर्तुत्व या गुणांमुळे ते राष्ट्रीय नायक म्हणून ओळखले जातात असे उद्गार काढले.
रयतेचे राज्य स्थापन करून विश्वस्त म्हणून त्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या छत्रपती शिवरायांनी आपल्या विरागी व त्यागी वृत्तीने जनतेला दिलेला संदेश पाहता अशा वृत्तीचा राजा आपल्याला भेटला हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले मागील काही वर्षापासून दिल्ली येथील आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती उत्सव शासनामार्फत भव्य प्रमाणात सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपतींनी निर्माण केलेले गडकोट किल्ले यांचे जतन व संवर्धन हे शासनामार्फत केले जाईलच मात्र ते करत असताना ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे अशी स्पष्ट संकेत दिले रायगडाच्या पायथ्याशी निर्माण करण्यात येणाऱ्या शिवसृष्टी मध्ये छत्रपतींच्या समवेत त्यांच्याबरोबर निष्ठेने लढणाऱ्या सरदारांचा इतिहास देखील भावी पिढीसाठी दाखविला जावा असे सूचना करून या शिवसृष्टी निर्मित आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य शासनाकडून दिले जाईल अशी ग्वाही दिली राज्यातील असणारे शासन हे छत्रपतींच्या आशीर्वादानेच निर्माण झाले असून ते आदर्श व शिवप्रभूंचे सरकार म्हणून सर्वत्र ओळखले जाते असे त्यांनी निदर्शनास आणले.
तत्पूर्वी आपल्या मनोगतामध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्वागताध्यक्ष मंत्री भरत शेठ गोगावले यांनी राज्य व देशभरातील नागरिक विविध देवधर्माच्या ठिकाणी प्रतिवर्षी जातात त्याचप्रमाणे त्यांनी एक वेळ किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावे असे आवाहन केले. आपल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य हे आगामी 50 हजार वर्षात कायम राहील ते कदापी पुसले जाऊ शकणार नाही असे सांगितले. आज या सोहळ्यासाठी आलेले सर्व शिवभक्त हे भाग्यवंत असून त्यांना याची देही याची डोळा हा सोहळा पाहता आला त्या हजारो शिवभक्तांना त्यांनी धन्यवाद दिले.
किल्ले रायगडावर असणाऱ्या धनगर समाजाच्या नागरिकांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली खाली करण्याबाबतची वनखाते व केंद्रीय पुरातत्त्व खात्याने दिलेल्या सूचने संदर्भात आपल्या आक्रमक शब्दात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाची घरे येथे कायम राहतील असे सांगितले.
मान्यवरांच्या मनोगतापूर्वी राजसद्रेवर आचार्य पुरोहित जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तसेच संयोजकांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आला . आज सकाळी साडेसात वाजता नगर खाण्यासमोरील ठिकाणी ध्वजवंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली .
राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दुपारपासून झालेल्या कार्यक्रमात मर्दानी खेळ शाहिरी परंपरा दाखवणारी ही रात्र शाहिरांची अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक सहा जून रोजी झालेल्या कार्यक्रमाप्रमाणेच या कार्यक्रमाला देखील हजारोंची शिवभक्तांची उपस्थिती संयोजकांच्या गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या कार्याला दिलासा देणारी ठरली.