

महाड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा हद्दपारचे आदेश आमदार भरत शेठ गोगावले यांच्या दबावाखाली शासनाने दिले आहेत, असा गंभीर आरोप करून या आदेशाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती विन्हेरे विभागातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी आज (दि. १९) शिरगाव येथील पत्रकार परिषदेत दिली.
महाड तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या विन्हेरे विभागातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना पुढील तीन महिन्यांसाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश महाडचे प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी दिले आहेत. यावर ओझर्डे यांनी आमदार गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्यावर दाखल असलेले गुन्हे हे पाईपलाईन लिकेज प्रकरण, एसटी आंदोलन आणि अन्य छोट्या घटनांसंदर्भात आहेत. आपल्याला तीन महिने जिल्हा बाहेर पाठविल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास आमदार गोगावले यांच्यासह त्यांचे सुपुत्र विकास गोगावले, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, यांसह डीवायएसपी शंकर काळे, प्रांताधिकारी डॉ. बाणापुरे, महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे सर्व जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आमदार गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या विरोधातही अशीच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शासनाने माझी बाजू न ऐकता हा एकतर्फी निकाल दिला आहे. आपल्यावरील गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. जनसामान्यांच्या समस्या पूर्ततेसाठी शासनाच्या भूमिके विरोधात आंदोलनात्मक भूमिका बजावताना ते दाखल झाले आहेत. कोणताही गंभीर गुन्हा नाही. हद्दपारीच्या आदेशाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे, असे त्यांनी सांगितले.