

रायगड : मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामान अंदाजानुसार रायगड जिल्हयामध्ये आगामी चार दिवस म्हणजे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विजांचा लखलखाट व मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान याच चार दिवसांच्या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळे भातशेतीतील उभे आणि कापणीस आलेले पिक आडवे होऊन नुकसानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राच्या तज्ज्ञानी दिलेल्या माहिती नुसार, कोकण विभागात २० ते २६ ऑक्टोबर या दरम्यान पर्जन्यमान सरा- सरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधी दरम्यान २.४ मीमी एवढे सरासरी पर्जन्यमान असते ते यावेळी या कालावधी दरम्यान ६.२ मीमी होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा १५७.८४ टक्के जास्त राहण्याची शक्यता आहे. या कालावधी दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३२.१ व २१.१ डीग्री सेल्सीअस एवढे असते ते यंदा या कालावधी दरम्यान ते अनुक्रमे ३१.३ व ३१.४ डीग्री सेल्सीअस एवढे असण्याची शक्यता आहे.
दाणा भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करण्यात यावी. पावसामुळे तयार भात लोळण्याची शक्यता असून लोळलेले भात पावसामध्ये सापडल्याने दाणयांना कोंब फुटण्याची शक्यता असते.
पावसामुळे तयार भात पिक शेतात लोळण्याची शक्यता असून लोळलेले भात पावसामध्ये सापडल्याने दाणयांना कोंब फुटण्याची शक्यता असते. यासाठी पावसामुळे लोळलेल्या भाताच्या लोंब्या पारंपरिक पद्धतीने वेचून सरुक्षित ठिकाणी आणून मळणी करून सुरक्षित ठिकाणीपसरून ठेवण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला आहे. १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पावसाची असलेली शक्यता विचारात घेऊन भात कशापणीची कामे शक्यतो सकाळच्या वेळेत करावी. कापणी केलेले भात सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी.