

पुणे: आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकर्यांचा आहे. आम्ही शेतकर्यांसाठी लढतो, जो शेतकरी विरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग तो एकनाथ शिंदे असो किंवा मुख्यमंत्री असो. निवडणुकीपूर्वी शेतकर्याचा सातबारा कोरा- कोरा म्हणून दमणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नसल्याची टीका प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी केली.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस बच्चू कडू उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी फुले वाड्यातील फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते.
कडू म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब—ाह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? निवडणुकीवेळी शेतकर्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकर्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत.
आम्ही आमच्या राजकीय अस्तित्वापेक्षा लोकांचे जगणे सोपे व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. राजकारणामध्ये पदापेक्षा काही भूमिका कठोरपणे घेणे गरजेचे आहे. माझे संबंध सगळ्यांसोबत चांगले आहेत. भाजपने तीन- चार सीट दिल्या असत्या, शरद पवारांनीसुद्धा दिल्या असत्या पण आम्ही ते नाकारले. माजी मंत्री महादेव जानकर यांना रामभक्तांनी कसे फसवले किंवा पवारांची पॉवर कशी कमी झाली, याची अनेक उदाहरणे आहेत, असेही कडू यांनी सांगितले.