

Shiv Sena Eknath Shinde faction Raigad
महाड : महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी (दि. 2 डिसेंबर) नगरपालिका शाळा क्रमांक पाचच्या रस्त्यावर दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या घटनेतील महेश गोगावले व सुशांत जाधव यांच्यावर असलेल्या गुन्ह्या संदर्भातील त्यांनी केलेले हायकोर्टातील अटकपूर्व अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला, अशी माहिती सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महाडच्या शासकीय विश्रामगृहात तातडीने सायंकाळी बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सोमवारी झालेल्या मुंबई न्यायालयातील या सुनावणी प्रसंगी आपण स्वतः उपस्थित असल्याचे नमूद करून यावेळी न्यायमूर्तीने रायगड पोलिसांनी संबंधित गुन्ह्यातील एक आरोपी हा राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा मुलगा असूनही गुन्हा दाखल करण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी बोलताना सरपंच ओझर्डे यांनी मंत्री भरत शेठ गोगावले हे राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य असून त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात आपल्या मुलाला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाडचा राजकीय इतिहासातील या हाणामारी संदर्भात मागील आठवड्यात माणगाव सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोन्ही बाजूंकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्वक अर्ज दाखल करण्यात आल्याचे सरपंच ओझर्डे यांनी सांगितले .
याप्रसंगी महेश गोगावले यांच्या वकील अॅड. हर्षद भडभडे यांनी सुमारे अर्धा तास केलेला युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी विकास गोगावले यांच्यावर असलेले गुन्हे लक्षात घेता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येत नाही, असे सांगितले.
यासंदर्भात सोमवारी दुपारनंतर हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुशांत जाभरेकडे काही व्यक्तींकडून केले जात असल्याचे नमूद करून यामध्ये पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचा गौप्य स्फोट सरपंच ओझर्डे यांनी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. तरीही आपण या संदर्भात कायदेशीर बाजू मांडण्याचा विचार करीत असल्याचे नमूद केले .
प्रतिवर्षी वर्ष अखेरीस गोगावले कुटुंबीय शेवटचे तीन दिवस विविध ठिकाणी देवदर्शनास जातात. त्यावेळी विकास गोगावले त्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली.
आपण या संदर्भात घेत असलेला संदर्भ हा कोणाच्या व्यक्तिगत नसून विकास गोगावले यांनी आपल्यावर काही वर्षांपूर्वी केलेले हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये दहशतवाद निर्माण होऊ नये, यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
विकास गोगावले यांच्या वाढदिवशी शेतकरी संघटनेकडून आयोजित केला जाणारा कार्यक्रम योग्य नसून आपण शेतकऱ्यांच्या विरोधात नसून हा कार्यक्रम आयोजित करू नये, असे आपली संबंधित संघटनेला विनंती वजा आवाहन असल्याचे त्यांनी नमूद केले.