

Poladpur Taluka landslide affected villages
पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे या दरडग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी आपल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. स्वातंत्र्य दिनी गावात सरण रचून आत्मदहनाची तयारी सुरू असताना, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना दिलासा दिला आणि आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त केले.
ग्रामस्थांनी तहसीलदार, पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन पुनर्वसनाच्या मागणीसाठी प्रशासनासमोर आपली व्यथा मांडली होती. २०२१ च्या अतिवृष्टीमुळे झालेल्या दरड दुर्घटनेनंतर साखर सुतारवाडीतील ४४ आणि केवनाळेतील १२८ कुटुंबांना चार वर्षांपासून भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. शासनाने त्यांच्या घरांना धोकादायक घोषित केल्याने ते आपल्या मूळ घरी राहू शकत नाहीत. शासनाकडून पुनर्वसनाची ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.
१४ ऑगस्ट रोजी प्रशासनाने 'आपली माती आपली माणसे' संघटनेच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले. ग्रामस्थांचा ठाम आग्रह होता की निर्णय त्यांच्या उपस्थितीत आणि घटनास्थळीच घ्यावा. मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि महत्त्वाची घोषणा केली – सुतारवाडी आणि केवनाळे येथील दरडग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी अडीच लाख रुपये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त दहा लाख रुपये, असा एकूण १२ लाख ३० हजार रुपयांचा निधी मिळवून येत्या एका वर्षात दर्जेदार घरे बांधली जातील, असे आश्वासन दिले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार कपिल घोलप, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पीआय आनंद रावडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, मनसे व आपली माती आपली माणसे संघटनेचे प्रमुख राज पार्टे, निलेश कोळसकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, वैभव चांदे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उद्योजक रामदास कळंबे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.