

रायगड : जयंत धुळप
आपण गणेशमूर्ती तयार करतो, त्या सारेजण आपापल्या घरी नेतात, त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो, ते सर्वजण खूप मज्जा करतात, त्यांच्या सर्वाच्या घरी गणपती बाप्पा येतो, मात्र आपल्याच घरी मात्र गणपती येत नाही, अशी नाराजी गणेशमुर्ती निर्मीतीत जागतिकस्तरावर सुप्रसिद्ध अशा पेण मधील गणेशमुर्तीकांरांच्या घरातील बालगोपाळाची दरवर्षी असे.
पेण तालुक्यांतील खारेपाटात प्रथेचा जन्म
याच बाळगोपाळांची नाराजी दुर करण्याकरीता पेण मधील विशेषता पेण तालुक्यांतील खारेपाटातील गणेशमुर्तीकारांनी आपल्याही घरी गणपती आणण्याची प्रथा सुरु केली आणि एकदिवसांच्या या गणपतीचे आगमन भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थीला होते. भाद्रपद महिन्यातील या संकष्ट चतुर्थीला ग्रामीण भागात साखरचौथ असे म्हटले जाते.
गणेशमुर्ती विक्री करिता परगावी असल्याने घरी गणपती येत नसे
वर्षातील 365 दिवसांतील गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा नियमित गणेशोत्सवाचे 10 दिवस वगळता उर्वरित 355 दिवस पेणमधील सर्व गणेशमुर्तीकार हे गणेशमुर्ती निर्मितीच्या कामात व्यस्त असतात. पूर्वी गणेश चर्तुीच्या दिवशी गणेशमूर्ती विक्रीकरिता पेण मधील मूर्तीकार गणेशोत्सावाच्या पूर्वी किमान 15 दिवस आधी परगावी जात असत.
गणेशमूर्ती विक्री करुन ते गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री वा दुसर्या दिवशी आपापल्या घरी परत येत असत. परिणामी या गणेशमूर्तीकारांच्या घरी त्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती आणून प्राणप्रतिष्ठापना करणे केवळ अशक्य असे. परिणामी गणेशमुर्तीकारांच्याच घरी गणपती नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असे. आणि त्यांतूनच गणेशमुर्तीकारांच्या कुटूंबांतील लहान मुले नाराज होत असत.
100 वर्षांपूर्वी सुरु झाली साखरचौथ गणपती प्रथा
बालगोपाळाची नाराजी दूर करुन त्यांनाही गणेशागमन आणि गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा या भावनेतून गणेशमुर्तीकारांनी भाद्रपद संकष्टी चतूर्थी म्हणजेच साखरचौथ या दिवशी आपल्या घरी गणपती आणण्यास सुरुवात केली, आणि ही आगळी साखरचौथ गणपतीची परंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वी सुरु झाल्याची माहिती पेणमधील चौथ्या पिढीचे गणेशमुर्तीकार आणि गणेशमूर्ती इतिहास अभ्यासक श्रीकांत देवधर यांनी दिली आहे.
पेणमध्ये सुरु झालेली परंपरा कोकणात सर्वत्र स्विकारली
पेण मधील गणेशमुर्तीकारांनी सुरु केलेली ही साखरचौथ गणपतीची परंपरा कालांतराने रायगड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील गणेशमुर्तीकारांनी तर सुमारे पंन्नास वर्षांपूर्वी ठाणे, पालघर आणि काही प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशमुर्तीकरांनी ही साखरचौथ गणपतीची परंपरा स्विकारली.
गेल्या 20 वर्षांपासून साकरचौथ गणपती झाले सार्वजनीक
दरम्यान गेल्या 20 वर्षांपूर्वी या साखरचौथ गणपतीचे रुपांतर सार्वजनिक गणेशोत्सवात झाले आणि सद्यस्थितीत कोकणातील सर्वच जिल्ह्यात साखरचौथ सार्वजनीक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येवू लागले आहे. रायगड जिल्ह्ह्यातील पेणमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाकरिता पाच ते सहा हजार गणेशमुर्तींची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती पेण मधील गणेशमूर्तीकारांनी दिली आहे.