रोहा: रोहा तालुक्यातील निडी गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमप्रकरणातील वादातून २७ वर्षीय युवकाने २० वर्षीय तरुणीचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (२०) तर युवकाचे नाव रोहित जनार्दन पाटील (२७) असे आहे. दोघेही निडी गावातील रहिवासी होते. रोहित हा पोलीस भरतीची तयारी करत असतानाच महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होता, तर तन्वी रोहा येथील एका खासगी दुकानात काम करत होती. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
सोमवारी रात्री निडी येथील लक्ष्मण गडेकर यांच्या बंद घरात दोघे एकत्र असताना त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, संतापाच्या भरात रोहितने तन्वीचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याच खोलीतील पंख्याला दोरी बांधून स्वतःही आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी ही घटना उघड होताच निडी गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्या आणि आत्महत्येमागील नेमके कारण पोलिसांकडुन शोधले जात आहे.