

रोहे : महादेव सरसंबे
रोहा तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पावसाने हाहा:कार उडवून दिला आहे. डोंगर माथ्यावरून वाहत येणारे नदी नाले तुडुंब भरून वाहत येत आहेत. हे संपूर्ण पाणी कुंडलिका नदीच्या पात्रात गेल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा-अष्टमी पुलावरून पाणी वाहू लागले असून नदीकिनारीच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कुंडलिका नदीने धोकाची पातळी ओलांडली असून रोहा अष्टमी ला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागले होते. त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद होती तर दुसरीकडे मोठ्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आल्याने नागोठणे कडील मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अलिबाग व नागोठणाकडील वाहतूक बंद होती.
रविवारी सकाळी रोहा नागोठणे मार्गावरील भिसेखिंड येथे झाड व रस्त्यावर माती आल्याने हा पूर्ण मार्ग दिवसभर वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्यावर होते. त्यामुळे नागोठणे, पुणे, मुंबई, पाली आदी शेहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे. युध्द पातळीवर माती व झाड काढण्याचे काम प्रशासनाकडून चालू होते.
खबरदारांची उपाय म्हणून रोहा अष्टमी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस व नगरपरिषद प्रशासन कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले होते. रेल्वे मार्ग चालू असल्याने रोहा रेल्वे स्टेशन ते रोहा शहर परंतु येण्यासाठी नागरिकांना पाण्यातून यावे लागत होते. वसंत डोलकर व त्यांचे सहकारी यांच्यासह पाणी वाढल्यानंतर सामाजिक संस्था निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्थाच्या कार्यकर्त नागरिकांना सुखरूप पणे शहराकडे सोडत होते.
अष्टमी नाकात सह काही भागांमध्ये सकल भागामध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. रोहा तालुकातील कुंडलिका, नागोठणे येथील अंबा व कोलाड येथीलम्हैसदरा या नद्यांनी धोक्याचे पातळी ओलांडली होती त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी मय वातावरण दिसून येत होते. पोलीस महसूल व नगरपरिषद यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मुख्याधिकारी अजय कुमार एडके हे अधूनमधून पाहणी करत होते. काही भागात भात शेती पाण्याखाली गेली होती. तर दुसरीकडे भुवनेश्वर निवी मार्गावर कालव्याचे पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील रोहा शहरासह मेढा, नागोठणे, एनघर, खांब, कोलाड, घोसाळे, भालगाव, धाटाव, यशवंतखार चणेरा, सुतारवाडी, देवकान्हे, धामणसई आदी विभागात जोरदार पाऊस पडला आहे.
आजची पाऊस परिस्थिती पाहता, तसेच रोहा भिसे खिंडीत झाडे, माती दगड उमळून रस्त्यावर आली आहेत. ती बाजूला काढण्यात येत आहेत. परंतु पाऊस खूप असल्यामुळे खिंडीत दरड खाली येण्याची शक्यता पाहता रोहा- भिसे -नागोठणे रस्ता आज बंद ठेवण्यात येत आहे. कोणीही या मार्गांवरून प्रवास करू नये.
किशोर देशमुख, तहसीलदार, रोहा
कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कृपया घराबाहेर पडू नका आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी शांत राहून आवश्यक ती काळजी घ्यावी. मी, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहोत.
वनश्री शेडगे, नगराध्यक्षा, रोहा-अष्टमी नगर परिषद
रोहा अष्टमी शहरात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यास रिक्षा फिरवून त्यांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. रोहा अष्टमी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी व्यवस्थापन अलर्ट मोडवर आहे.
अजयकुमार एडके, मुख्याधिकारी, रोहा-अष्टमी, नगर परिषद