

खांब: रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवस उष्णतेची भयानक लाट आहे. पारा 40 अंशाहून अधिक असून आधिच उष्म्याने नागरीक हैराण त्यात महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा सावळागोंधळ सुरु आहे. दुपारच्या सुमारास रोहा, धाटाव, कोलाड, खांब परिसरात होणारा खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील जनता कमालीची हैराण होत सर्वत्र संताप व्यक्त करत आहेत.
11 एप्रिलपासून ठीक ठिकाणी लग्नसराईची जय्यत तयारी सुरू असून त्यात बत्तीगुल प्रकार त्यामुळे अशा शुभकार्यात विद्युत महामंडळाच्या सावळा गोंधळाचे विघ्न त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे.
गेली अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे मात्र यावर संबंधित खात्याकडून कोणतीच उपाय योजना केली जात नसल्याचे बोलले जात आहे.तर गेली चार पाच दिवसांपासून राज्यात तसेच रायगड जिल्हयातील विविध भागात भयानक उष्णतेचा पारा चढला असताना रोहा, कोलाड, विभाग विद्युत महामंडळाकडून दररोज थोडा थोडा होत असलेला खंडित वीज पुरवठा त्यामुळे येथील जनता कमालीची हैराण झाली आहे.
येथील विद्युत पुरवठा वेळोवेळी कोणत्या कारणांमुळे खंडित होतो याचे कारण समजू शकले नाही परंतु या परीसरात कार्यरत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यावर ठोस उपाय योजना करण्यास कुच कामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. चैत्र महिना सूरू आहे.
वैशाख सुरू होणार असून त्यात काही ठिकाणी लग्न सराईत लग्न मंडप उभारण्याची कामे सुरू आहेत. तसेच देव देवतांचे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सर्वत्र मोठया उत्साही वातावरणात गावोगावी सुरू झाले आहेत. यात अनेक ठिकाणी लग्नसराई असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे.
पुढील 3-4 दिवस उष्णता कायम राहण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून प्रखर सूर्यप्रकाश, कोरडे वातावरण, उष्णतेची लाट त्यामुळे नागरिकांना कडक उष्मांला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांनीही या उष्णतेपासून काळजी घेतली पाहिजे.तर पुढे येणारा पावसाळा आणि मोठ्या पावसात विद्युत विद्युत वाहिन्यांवर मोठ मोठे झाड आणि त्यांच्या फांद्या यांच्यामुळे होणारा परिणाम यावर सदरील विद्युत महामंडळाकडून काही कामे करण्यात येत असावीत यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असावा परंतु सध्या मोठी उष्णतेची लाट आणि उन्हाची ताप यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने तूर्तास या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा.
- डॉ. मंगेश सानप, सामाजिक कार्यकर्ते कुणबी समाज, कोलाड विभाग