

रायगड: पर्यटन नगरी असलेल्या अलिबाग शहराजवळील नैसर्गिक कांदळवन (मॅन्ग्रुव्ह) क्षेत्रावर सातत्याने कचरा टाकून भराव केला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या कांदळवनाचा नाश थांबविण्यासाठी माजी नगरसेवक व ज्येष्ठ नागरिक अमर वार्डे यांनी कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांना 8 एप्रिल 2026 रोजी सविस्तर तक्रार पत्र दिले आहे. सोबत मार्च-एप्रिल 2026 मधील कांदळवनावर पसरलेल्या कचरा व मातीच्या भरावाचे फोटो व यापूर्वी केलेला पत्रव्यवहार जोडला आहे.
वार्डे यांनी पत्रात म्हटले आहे, मी 1974 ते 2001 या काळात 15 वर्षे अलिबाग नगरसेवक होतो. शहरातील समस्यांची मला पूर्ण माहिती आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी कांदळवन संरक्षणासाठी समिती नेमली आहे, पण प्रत्यक्षात 2024 पासून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या तरी कोणतीही कारवाई झाली नाही. दक्षिण कोकण कांदळवन विभागाच्या वन अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली, पण त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी पुढे नमुद केले आहे.
रेवदंडा रोडवरून अलिबाग शहरात येताना नगर परिषदेच्या हद्दीत रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. याच ठिकाणी नगर परिषदेकडून वर्षानुवर्षे कचरा टाकला जातो. परिणामी कांदळवन नष्ट होत चालले आहे. वार्डे यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते, पण कोणतीही कारवाई झाली नाही.
आता मार्च-एप्रिल 2026 मध्ये कांदळवन पूर्णपणे कचरा व मातीने झाकलेले दिसत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, रंगीत पिशव्या, कपडे व इतर कचरा पसरलेला आहे. कांदळवन हे वन (संरक्षण) कायदा 1980, पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 व वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहे. याचा नाश करणे हा गुन्हा आहे. तरीही नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. वार्डे व सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी यापूर्वी दक्षिण कोकण कांदळवन विभागाकडेही तक्रार केली होती.
अलिबाग नगर परिषदेचा कचरा ठेका संपुष्टात आल्याने शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर, नाल्यांमध्ये व कांदळवनात कचरा साचत आहे. यामुळे आरोग्य समस्या उद्भवत आहेत. शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेचा खर्चही नगर परिषद करत असल्याचे वार्डे यांनी पत्रात नमूद केले आहे. वार्डे यांनी आयुक्त अग्रवाल यांना अलिबाग शहराजवळील कांदळवनाचा नाश तातडीने थांबवा. पर्यावरण रक्षणासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करा,अशी विनंती केली आहे.
संपूर्ण कोकणातील गंभीर समस्या
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या कोकणातील खाड्यांतील कांदळवनांवर भराव होत असून ती नष्ट होत आहेत. त्यामुळे कांदळवन क्षेत्र संरक्षण ही बाब केवळ अलिबागपुरती मर्यादित नसून संपूर्ण कोंकणातील कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर आहे. कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याकडे तातडीने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत.