

Risk of heavy rain remains in Raigad, orange alert today; 260 houses damaged
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाने आपला जोर कायम ठेवला. जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटाने मुसळधार पाउस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. काही मार्गांवर झाडे पडल्याने त्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवारसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असल्याने मुसळधार पावसाचा धोका कायम आहे.
गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या २४ तासात रायगडात १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने बुधवारसाठीही ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे.
रायगडात अलिबाग, मुरुड, म्हसळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेले आहे. नुकसानीचे पंचमाने करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. महावितरणला या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. रायगडमध्ये पावसामुळे २६० पक्क्या घरांचे तर १३ कच्च्या घरांचे नुकसान झालेले आहे.
याशिवाय २ प्राथमिक आरोग्य केंद्रे, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्री आदींनाही पावसाचा तडाखा बसला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पनवेल, पनवेल ग्रामीण, माणगाव आणि सुधागड पाली तालुक्यातील मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे. एक म्हैस आणि एका बकरीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी एकही नदी धोक्याच्या पातळीवर गेलेली नाही.
यावर्षीच्या पावसाळ्यात १८ वेळा उधाणाची मोठी भरती असणार आहे. यावेळी चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. गेली तीन दिवस व २८ मे या चार दिवस उधाणाची मोठी भरती असून साडेचार मीटरपर्यंत उंच लाटा उसळणार आहेत. मंगळवारी (२७ मे) अलिबाग किनाऱ्यावर उसळलेल्या समुद्री लाटा. दुपारी भरतीच्या वेळी रायगडच्या किनाऱ्यावर उंच लाटांचे तांडव पहायला मिळाले.