

Landslide in Gavalwadi area of Kol village, atmosphere of fear among villagers
वरंध : पुढारी वृत्तसेवा
महाड तालुक्यातील कोल गावात गवळवाडीवरील डोंगराच्या 100 मीटर अंतरावरून मोठे तीन ते चार दगड निसटून खाली आले. याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क झाले आहे.
या संदर्भात गावातील सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी सोशल मीडियावरून या संदर्भातील माहिती पोस्ट केली असून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यासाठी ग्रामस्थ तातडीने जाणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
या गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सभापती विजय धाडवे यांनी देखील याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कोल गवळवाडी व परिसरातील नागरिकांना या संभाव्य आपत्तीला रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
मागील 10 ते 12 दिवसांपासून महाड शहरासह तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने तुफान निर्माण केले आहे. महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पोलादपूर तालुक्यातले बाजीरा धरण भरून कालपासूनच वाहू लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मोसमी पावसाला सुरूवात होण्याआधीच धरण भरून पाहू लागल्याने आगामी काळात या धरणात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची नवीन जबाबदारी या विभागावर आली आहे. एकूणच महाड तालुक्यात आगामी चार महिन्यात आपत्ती व्यवस्थापनाला 24 तास अलर्ट मोडवर राहावं लागेल हे स्पष्ट झाले आहे.