

खडवली: महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह भाजीपाला, खाद्यतेल, गॅस आणि इंधनाच्या खर्चात वाढ झाल्याने महिन्याचे बजेट सांभाळताना नागरिकांची दमछाक होत आहे. वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांच्या घर खर्चाचे गणित कोलमडले आहे.
पावसाळ्यामुळे रोजंदारीची कामे कमी झाल्याने कमी उत्पन्न आणि वाढता खर्च अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे.
परिसरातील बाजारपेठेत सध्या साखरेचा दर, कांद्याचे दर तसेच वाढत्या दरातील भाजीपाला सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा ठरत आहे. तर विविध प्रकारच्या भाज्यांचे दरही अनेक ठिकाणी वाढतेच दिसून येत आहेत. रोजच्या भाजीपाल्याच्या खरेदीसाठीही ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
चहा, साखर, दूध आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या खर्चाबरोबरच रोजच्या चहाच्या कपावरही महागाईचा परिणाम जाणवत आहे. पूर्वी किरकोळ वाटणारा हा खर्चही आता महिन्याच्या बजेटमध्ये जाणवू लागला आहे. “दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढत असताना उत्पन्न मात्र त्याच प्रमाणात वाढलेले नाही,” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना पावसाळ्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.
बांधकाम, शेतीमजुरी तसेच इतर रोजंदारीची कामे कमी झाल्याने अनेक कुटुंबांसमोर उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला नियमित काम नाही आणि घरातील खर्च मात्र दिवसेंदिवस वाढताच असलेला दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने बाजारभावावर लक्ष ठेवावे, स्वस्त धान्याचा पुरवठा सुरळीत करावा आणि गरजू नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महागाई आणि बेरोजगारीच्या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत असून, “उत्पन्न वाढत नाही; मात्र खर्चाचा आलेख सतत वाढतोय,” अशी परिस्थिती अनेक कुटुंबांमध्ये निर्माण झाली आहे.