

महेंद्र खैरे
रेवदंडा: मान्सूनच्या आगमनास विलंब होत असल्याने रेवदंडा पंचक्रोशीतील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य ग्रामस्थ चिंतेत सापडले आहेत. जून महिन्याचा मध्य उलटत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. विहिरी, बोअरवेल आणि पाणवठ्यांची पातळी घटल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतकरी शेतीची पूर्वतयारी पूर्ण करून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भात लागवडीसाठी शेतांची मशागत, बांधबंदिस्ती आणि अन्य कामे पूर्ण झाली असली तरी पावसाअभावी पेरणी व लागवडीची कामे रखडली आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तीव्र उष्णतेमुळे बागायतदारही चिंताग्रस्त झाले आहेत. आंबा, नारळ, सुपारी तसेच इतर फळबागांवरील झाडांना पाण्याअभावी ताण जाणवत असून अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी खर्च वाढला आहे. सततच्या उकाड्यामुळे नव्या लागवडींनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रेवदंडा पंचक्रोशीसह मुरूड तालुक्यातील साळाव, कोर्लई, बोर्ली, मांडळा, शिरगाव, मिठेखार, वळके, चोरढा तसेच अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, थेरोंडा, चौल, नागाव, वावे, खानाव, रामराज, वळवळी, चिचोंटी, सुडकोळी आदी भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर असून ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.