

Retreating monsoon impacts Raigad crops
जेएनपीए : विठ्ठल ममताबादे
परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकांबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या उरण पूर्व भागातील कडधान्य पिकांना बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. यामुळे यावर्षी उरण तालुक्यात कडधान्य पिकांची लागवड उशिरा होणार असल्याची माहिती कडधान्य उत्पादक शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, अनिल केणी, दत्तात्रेय म्हात्रे या शेतकऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यातील वाल पिकाला भौगोलिक वातावरण असून, येथील जमीनीत वाल, चवळी, हरभरा, मूग या कडधान्य पिकांना जसा हवा तसा ओलावा टिकवून धरणारी कसदार अशी विशेष गुणधर्म असणारी खांबारी जमीन असल्यामुळे, या विभागात मोठ्या प्रमाणात शेतकरी रब्बी हंगामातील कडधान्य पिके घेत आहेत. पिवळ्या मोठ्या आकाराचे व रुचकर वालाचे पीक येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत पिकत असल्यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील वालांना एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
दरवर्षी स्थानिकांसह पर्यटक देखील तालुक्यातील चिरनेर पूर्व विभागातील वाल, चवळी, मूग हरभऱ्याचे कडधान्य खरेदी करतात. दरम्यान यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. भातशेतीला पोषक असे वातावरण मिळाले आहे. परंतु परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.त्याची झळ या परिसरातील कडधान्य पिकांना पोहोचली असल्याची चिंता कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिला आहे. ओलाव्यामुळे कडधान्य पिकांची पेरणी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कडधान्य पिकांची लागवड यावर्षी उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जात असतांना, कडधान्य उशिरा बाजारात दाखल झाल्यास त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परतीची अवकाळी पावसामुळे भात शेतीची कामे रखडली असून, ती लांबणीवर जात आहेत. शिवाय शेतात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा ओलावा सुकेपर्यंत शेतकऱ्यांना नांगरणी करता येणार नाही. टोचणीचे व फेकणीचे वाल चवळी हरभऱ्याचे धान्य टाकण्यासही शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दत्तात्रेय म्हात्रे, शेतकरी, चिरनेर-उरण