Shrivardhan Water Crisis: श्रीवर्धनमध्ये जलसंकटाचे सावट! चार दिवसाआड पाणी; टँकर पुरवठ्याची मागणी

रानवली धरणातील जलसाठा संपत आल्याने नागरिक चिंतेत
Shrivardhan Water Crisis
Shrivardhan Water CrisisPudhari
Published on
Updated on

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील जलसाठा अत्यंत खालावल्याने शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस धरण जवळपास कोरडे पडल्याचे चित्र समोर येत असून, शहरातील अनेक भागांत नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. वाढते तापमान, घटता जलसाठा आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच विविध तांत्रिक त्रुटी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटणे, गळती होणे आणि हजारो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना सातत्याने घडत राहिल्या. नागरिक आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी याकडे लक्ष वेधले असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे.

Shrivardhan Water Crisis
Malnutrition Cases: कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी १,००० दिवस निर्णायक; सॅम-मॅम बालकांवर विशेष लक्ष

स्थानिकांच्या मते, उन्हाळ्यापूर्वीच जलसाठ्याची पातळी कमी होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. मात्र पर्यायी जलस्रोतांचा शोध, जलसंधारण उपाययोजना, गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम किंवा टँकर व्यवस्थेचे आगाऊ नियोजन यांसारख्या उपायांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी आता नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अनेक भागांत अपुरा ठरत असून, नागरिकांना पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. काही भागांत नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून त्यामुळे आर्थिक भारही वाढला आहे.

Shrivardhan Water Crisis
Mumbra Power Cut: मुंब्र्यात टोरंट पॉवरचा अंधाराचा खेळ, संताप शिगेला; मध्यरात्री नागरिकांची घुसमट

जलनियोजनावर भर गरजेचा

रानवली धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असताना प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तातडीच्या उपाययोजनांसह भविष्यातील जलनियोजनावर भर देणे गरजेचे असून, अन्यथा येत्या काळात श्रीवर्धनकरांना अधिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news