

चोंढी : अब्दुल सोगावकर
अलिबाग तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या असलेल्या रामधरणेश्वरच्या डोंगरावर सतत तीन दिवस लागलेल्या वणव्यात कोट्यवधींची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. या वनक्षेत्रातील गस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या वनक्षेत्रात वणवा लागल्याचे समजताच मुनवलीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी जात मोठ्या शर्थीने सदर आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही परत वणवा लागून उरलासुरला डोंगर जळून काळी चादर पसरली गेली. याबाबत वनक्षेत्रात गस्त वाढविण्याबाबतीत वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरण प्रेमींनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
रविवारी दुपारच्या वेळी वणवा लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून वणवा लागल्याची माहिती दिली. वन कर्मचारी येईपर्यंत सचिन घाडी यांनी वेळ न दवडता, आपल्या मित्रमंडळीसह वणव्याच्या ठिकाणी जाऊन मोठ्या मेहनतीने आग आटोक्यात आणली. या डोंगरावर आदिवासींची घरे मोठ्या प्रमाणात असल्याने ती वाचविण्यात आग विझविणाऱ्यांना यश आले.
रामधरणेश्वर डोंगराच्या वरिल बाजुस पंचक्रोशीतील गायी, बैल, म्हशी, बकऱ्या आदी पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात चरत असतात, या वणव्यामुळे गुरांच्या चाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याठिकाणी औषधी वनस्पती, रानटी मेवा, निरनिराळ्या प्रकारच्या पक्ष्यांची अंडी व त्यांचा निवारा मोठ्या प्रमाणावर असल्याने जळून त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, आग विझविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी सचिन घाडी यांच्यासह नितेश ठकरूळ, आदिवासी तरुण संदेश वाघमारे, गणेश पवार, रामजी पवार, अनिल पिंगळा, मोतीराम पारधी, सागर लेंडे तसेच वनविभागाचे वनरक्षक आकांक्षा खांडवे, कावेरी दराडे, राम टाकरस, निखिल दणाने यांच्यासह आदी मित्रपरिवार मदतीला धावून आले. यावेळी प्रामुख्याने रविवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही वनविभागाचे कर्मचारी वर्ग आग विझविण्यासाठी आवर्जून उपस्थित होते, त्यांचेही पर्यावरण प्रेमींनी कौतुक करत आभार मानले आहेत.
येथील सचिन घाडी यांनी सांगितले की, डोंगराच्या पायथ्याशी असलेले शेतकरी आपल्या शेतात कडधान्ये, आंबा, वाल, तोंडली, दुधी, कारली, पडवळ, व इतर भाजीपाल्याची व फळबागांची लागवड करत असतात, डोंगरावरील चारा जळाल्यामुळे ही गुरे खाली उतरून मोठ्या प्रमाणात शेतीची नासधूस करतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
वणव्यामुळे भोगावे लागणारे परिणाम
वणवा लागल्यामुळे वातावरणात बदल होऊन उष्णता वाढते. वनक्षेत्रात असणाऱ्या वन्यजीवांच्या पारंपरिक खाद्याचे नुकसान होते, परिणामी वन्य प्राणी खाद्य नसल्यामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना व मानवजातीला धोका निर्माण करतात. डोंगरावर असणारे जीवजंतू, सरपटणारे प्राणी, बिबटे, माकडे, डुकरे व इतर प्राणी मानवी वस्तीत येऊन नुकसान करण्याची देखील शक्यता वाढते. यांसारखे वणवा लागल्यामुळे अनेक धोके संभवतात.
वनविभागाने आग लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी करीत या पुढील काळात वनविभागाच्या क्षेत्रात वनकर्मचारी यांची गस्त वाढवत पर्यावरणाची हानी टाळावी.
सचिन घाडी, सामाजिक कार्यकर्ते