

Maharashtra Politics
खोपोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर आश्चर्य वाटायला नको. जर रिपाइंचे ऐक्य झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल. प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकले तर मी चार पाऊले मागे जाण्याची तयारी असून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्याची आपली तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खोपोली येथे जाहीर केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशिनाथ रूपवते यांच्या नेतृत्वाखाली तथागत भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव खोपोली शहरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, राजेंद्र गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे पक्ष एकत्र करून रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य हवे आहे. सध्या त्याची नितांत गरज असल्याचेही आठवले म्हणाले.
आपला समाज कष्टकरी, गरीब आहे. शहरातील लोकांची परिस्थिती चांगली आहे. म्हणूनच समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण काम केले पाहिजे. मणिपूर, आणि नागालैंड येथे पक्षाचे आमदार निवडून आलेत पक्षाला चिन्हही मिळाले आहे. महाराष्ट्रात सर्वच गावात पक्ष पोहचला असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत तीन खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याचा मेळावा आयोजित केला जावा, असे निर्देशाही त्यांनी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जि.प.४ तर पं. स. ८ ते ९ जागा लढण्यासाठी युतीतील जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करेन असेही ना. आठवले यांनी सांगितले. जयंती कमिटीचे प्रमुख रूपेश रूपवते, विशाल गायकवाड, प्रविण शिंदे, सलीम शेख यांनी आठवले यांना पुष्पहार घालून स्वागत केले तर प्रमोद महाडिक यांनीही आठवले यांच्या स्वागताचे बॅनर लावून स्वागत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरकर यांचा रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर फक्त बौध्द समाजाल एकत्र आणून चालणार नाही तर भटके विमुक्त, मराठा, ब्राम्हण, मुस्लिम, जैन यांच्या ६९ जातींना एकत्र करण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली तरच बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल असे आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगीतले.