

माणगाव : आ. महेंद्र दळवी आमचे मित्र आहेत. ते दोन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी आपले शब्द जरा जपून वापरे. इतरांनाही तशा प्रकारे बोलता येते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकण विभाग संघटक तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते अॅड. राजीव साबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. आम्हाला राजकारण शिकवू नये, असा सल्लाही साबळे यांनी आ. दळवी यांना दिला आहे.
या पत्रकर परिषदेला राष्ट्रवादीचे माणगाव शहराध्यक्ष सुनील पवार, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, अॅड. सुशील दसवते, विरेश येरुणकर, आदी उपस्थित होते. रोहा येथील एका कार्यक्रमात आ. महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व अॅड. राजीव साबळे यांच्यावर टीका केली. या टीकेबाबत अॅड. साबळे यांनी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी माणगाव विधी महाविद्यालय याठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेताना त्यांनी आ.दळवींवर जोरदार टिकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना अॅड. राजीव साबळे म्हणाले की, सर्वप्रथम मी आमचे नेते खा. सुनील तटकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला दिलेला शब्द पाळून माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग संघटक तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली. प्रवक्ते हे पद शिवसेनेनेही मला दिले होते. परंतु त्याठिकाणी मला काम करण्याची संधी व वाव देण्यात आला नाही. माणगावमधील संघटनेतील बदलामुळे संघटनेच्या कामाला निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
आ. दळवी यांच्यावर टिकास्त्र सोडताना अॅड. साबळे यावेळी म्हणाले की, मुळात महेंद्र दळवी यांनी कित्येकदा पक्ष प्रवेश केलेत ते त्यांनी आरशात पहावे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आख्खा पक्ष फोडून ते एकनाथ शिंदेंबरोबर गेले. त्यांनी आम्हाला राजकरण शिकवू नये. रोहा येथील कार्यक्रमात त्यांनी नर्सिंग कॉलेजचा उल्लेख करताना भरतशेठच्या आईच्या स्मरणार्थ असा उल्लेख केला. असे सांगत भरतशेठची आई अजून जिवंत आहे. जिवंत माणसाला स्मरणार्थ बोलत नाही हे कदापी महेंद्र दळवींना माहित नसावे असे सांगत त्यांनी आ. दळवी यांची खिल्ली उडविली.
माणगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात आ. दळवी आले होते तो कार्यक्रम नर्सिंग कॉलेजचा नव्हता तर मातोश्री गंगुबाई शिंदे सीबीएससी स्कुलच्या उदघाटनाचा होता, हे दळवींनी आधी माहित करून घेणे गरजेचे आहे. नर्सिंग कॉलेजच्या भूमिपूजनला खा. तटकरे व मंत्री भरत गोगावले हे दोघेपण उपस्थित होते.
भावनेच्या आहारी त्यांनी काहीपण बोलू नये. ते उगाचच कोणत्याही गोष्टीचा राजकरण करीत आहेत. सीबीएससी स्कुलच्या उदघाटन कार्यक्रमात तटकरे यांनी सीएसआर फंडातून निधी देण्या कबुल केले होते त्याची पूर्तता त्यांनी केली.