राजापूर : नगर परिषदांपाठोपाठ राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा उसळत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय वर्तुळाला मोठ्या प्रमाणावर वेध लागले आहेत. या निवडणुका नेमक्या केव्हा जाहीर होतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत येणारे 12 पंचायत समिती गणांमध्ये संभाव्य उमेदवारीवरून जबरदस्त चुरस सुरू झाली आहे. काही मंडळी तर आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून कामाला लागली आहेत, तर काहीजण आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याच विवंचनेत आहेत.
तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद गटासह आणि पंचायत समिती गणात पूरक आरक्षण पडले आहे तेथे तर मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची भाऊगर्दी उसळली आहे. राजापूर पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित झाल्याने सभापतीपदाची चुरस जरी संपली असली तरी उपसभापतीपदावर मात्र अनेकांचे लक्ष आहे.
राजापूर तालुक्यातील वडदहसोळ, तळवडे, जुवाटी, धोपेश्वर, साखरी नाटे, कातळी अशा 6 जिल्हा परिषद गटासह 12 पंचायत समिती गणांमध्ये वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर, पेंडखले, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश होतो.
मागील वीस वर्षे तालुक्यात एकही गट वा गण वाढलेला नाही. यापूर्वी नवीन प्रभाग रचनेत तालुक्यात एक जि. प. गट आणि त्या अंतर्गत दोन पंचायत समिती गण वाढणार होते. त्यावेळच्या रचनेनुसार सात जिप गट आणि चौदा पंचायत समिती गण ठरले होते. तथापी नंतरतो निर्णय रद्द होऊन पूर्वी होते तेच गट आणि गण कायम ठेवण्यात आले. मात्र नावात बदल करण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 6 ही जि.प. गट नवीन नावाने ओळखले जातील, तर 12 पंचायत समिती गणांमध्ये केवळ ताम्हाने, केळवली, सखरीनाटे आणि अणसुरे हेच गण पूर्वीच्याच नावाने राहणार असून बाकीचे गण नवीन नावाने ओळखले जातील. 6 जि. प. गटासह 12 पंचायत समिती गणात जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुकूल आरक्षण जेथे पडले आहे (सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग) तेथे तर मोठी स्पर्धा पहावयास मिळत आहे. एकेका जागेसाठी प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक बाशिंग बांधून बसले आहेत. यामध्ये आजी, माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे. त्यामुळे अंतिम उमेदवार निश्चित करताना प्रत्येक पक्षाची मोठी कसोटी लागणार हे निश्चित आहे.
काही उतावीळ इच्छुक तर आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून कामाला लागले आहेत. त्यांनी प्रभागात दौरेसुद्धा सुरु केले आहेत, तर वाढत्या स्पर्धेमुळे आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही या विवंचनेने काही इच्छुकांना ग्रासले आहे. उमेदवारीबाबत वाढत्या चुरशीमुळे उमेदवारात साशंकता पसरली आहे.
सर्वसाधारण पणे पंचायत समितीचे सभापतीपद हा कळीचा मुद्दा असतो. मात्र यावेळी राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला असे आरक्षित झाल्याने मोठी स्पर्धा संपली आहे. राजापूर तालुक्यात नाटे आणि ताम्हाने पंचायत समितीचा गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला असा आरक्षित झाल्याने त्या दोन्ही गणांवर मोठे लक्ष आहे. मात्र महिलांसाठी आरक्षित असलेल्या अन्य सर्वसाधारण गणातून रिंगणात असलेली एखादी महिला उमेदवार की जिच्याकडे ओबीसी आरक्षणाचे प्रमाणपत्र आहे त्या महिलेला सभापतीपद मिळू शकते म्हणून आणखी एक पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली