वर्षा पर्यटनाचा अतिउत्साह बेततोय जीवावर

रायगडात महिनाभरात १३ जणांचा बुडून मृत्यू
Raigad monsoon drowning deaths
वर्षा पर्यटनाचा अतिउत्साह बेततोय जीवावर File Photo
Published on
Updated on

रायगड : किशोर सुद

रायगड जिल्ह्यातील नदी, तलाव आणि समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा आजही रामभरोस आहे. त्यामुळे नदी, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिउत्साह आणि निष्काळजीपणामुळे अल्पवयीन मुले, पर्यटक यांचा बळी जात आहेत. गेल्या एक महिनाभरापासून रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या सात घटनांमध्ये १३ जणांचा बळी गेला आहे. यात ७ पर्यटकांचा समावेश आहे. १३ मृतांमध्ये ७ जण अल्पवयीन आहेत. त्यामुळे नदी, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा उपाययोजनांची गरज आहे.

गेल्या काही वर्षात रायगड जिल्हयात पर्यटकांचे प्रमाण वाढू लागले आहे. अतिउत्साह, मद्यपान आणि नदी, धरण आणि समुद्र किनाऱ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. २५ मे ते २४ जून या एका महिन्याच्या काळात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २५ मे रोजी माणगाव तालुक्यातील भीरा कॉलनी येथे एक २५ ते ३० वयोगटातील पर्यटक नदी पोहोण्यास गेल्याने वाहून गेल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.

२८ मे मे रोजी रोजी मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी मुंबई-परेल येथील १७ वर्षीय ऋषभ दास हा समुद्रात पोहोण्यास गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर ९ जून रोजी उरण तालुक्यातील पिरकोन येथे नीरा पाटील (वय २५) व तिचा मुलगा रिहान पाटील (वय ७) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

नीरा पाटील या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. १३ जून रोजी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पुणे आळंदी येथील पर्यटक अविनाश शिंदे (वय २७) हा पोहोण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. २१ जून रोजी खालापूरात मोठी घटना घडली. मुंबईतील एका महाविद्यायातील एससीसीचे विद्यार्थी खालापूर तालुक्यातील सोंडाई किल्लयावर ट्रेकिंगसाठी आले होते. त्यातील एकलव्य सिंग (वय १७), ईशांत यादव (वय १९), आकाश माने (वय २६), रणथ बंडा (वय १८) हे पोखरवाडी बंधाऱ्यात पोहोण्यास उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या बंधाऱ्यावर पावसाळ्यात कलम १४४ लागू करून पर्यटकांना बंदी केली जाते मात्र यावर्षी येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू झालेले नसल्याचे सांगण्यात येते. २२ जून रोजी महाड तालुक्यात बुडून मृत्यू पावण्याच्या दोन घटना घडल्या.

तालुक्यातील दादली येथे नामदेव आंबवले (वय २१) हा तरुण गुरे चारताना सावित्री नंदी घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तर ढालकाठी येथे सुनील बांदल (वय ३२) हा तरुण काळ नदीमध्ये पोहोण्यास गेला असता बुडून मृत्यू झाला. तर २३ जून रोजी अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे अथर्व हाके (वय १६) व शुभम बाला (वय १५) हे मित्रांसह तलावात पोहोण्यासाठी गेले असता दोघांचा बुडून मृत्यू झाला.

अतिउत्साहावर पालकांनीही लक्ष ठेवण्याची गरज

तरुणांच्या अतिउत्साहावर पालकांनीही लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने देखील नदी, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची गरज आहे. अद्याप मोठा पावसाळा झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news