

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या मंगळवारी (७एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सभापतींचे खातेवाटप करण्यात येणार आहे. महत्वाच्या विषय समित्यांसाठी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्यचे रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाला कुठली समिती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या २३ मार्चला झालेल्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत दोन सभापती पदे शिवसेनेच्या वाट्याला आली तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एकेक सभापती पद राहिले. यात शिवसेनेच्या रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांचा समावेश आहे. शिवाय उपाध्यक्षांकडे देखील विषय समिती सभापतीपद राहणार आहे.
शिवसेनेच्या रसिका केणी यांच्याकडे महिला बालविकास विभागाचे सभापतीपद आले आहे तर समाजकल्याण सभापतीपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांच्या गळ्यात पडली. उर्वरित सभापतींना विषय समित्यांचे वाटप मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केले जाणार आहे. यात अर्थ व बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन समिती यांचा समावेश आहे. अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती पदाकरिता शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे आग्रही आहेत.
आम्ही जिल्हा परिषदेत महायुती म्हणून काम करत आहोत. सभापतीपदाबाबत महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. त्यामुळे मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष याबाबतचा निर्णय जाहीर करतील.
महेंद्र दळवी, आमदार.